संभल, 25 जानेवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच आर्थिक फसवणुकीचेही प्रकार घडत आहे. तुम्ही कधी ऐकले आहे का, की 80 हजारांची म्हैस अवघ्या 10 रुपयांमध्ये नेली, नाही ना, पण असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एका व्यक्तीने तब्बल 80 हजारांची म्हैस 10 रुपये देऊन नेली. या घटनेप्रकरणी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. काय आहे नेमकं प्रकरण - उत्तर प्रदेशातील संभलमध्ये एका शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची घटना समोर आलीय. संभलच्या आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या अज्ञात व्यक्तीने एका शेतकऱ्याची 80 हजार रुपयांची म्हैस त्या शेतकऱ्याला अवघे 10 रुपये देऊन नेली आहे. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शेतकऱ्यानं तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं, पण पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. अखेर शेतकऱ्यानं पोलीस आयुक्तालय गाठून स्वतःच्या झालेल्या फसवणुकीचा प्रकार सांगितला, व तसा लेखी अर्ज दिला. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. फसवणुकीचा हा प्रकार जुनावई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रत्येक शनिवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात पशुपालक जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी येत असतात. दबथरा गावातील शेतकरी विजेंद्रसिंगसुद्धा या बाजारात स्वतःकडे असणारी म्हैस विकण्यासाठी आले होते. या म्हशीची किंमत 80 हजार रुपये होती. बाजारात विजेंद्रसिंग यांच्याकडे एक अज्ञात व्यक्ती आली, व त्याने म्हैस खरेदी करायची आहे, असं सांगितलं. त्यानुसार संबंधित अज्ञात व्यक्ती व विजेंद्रसिंग यांच्यामध्ये सौदा झाला. या वेळी म्हशीची किंमत ठरवून घेतल्यानंतर संबंधित अज्ञात व्यक्तीनं सिंग यांच्या हातात अॅडव्हान्स म्हणून 10 रुपये दिले.
तक्रार पत्र
अन् म्हैस घेऊन झाला फरार - शेतकऱ्याला अॅडव्हान्स दिल्यानंतर संबंधित अज्ञात व्यक्तीनं तिथे उभ्या असलेल्या एका वाहनाला म्हैस बांधली, व म्हैस विकल्याचा कागद आणण्यासाठी विजेंद्रसिंग यांना पाठवलं. हा कागद घेऊन विजेंद्रसिंग जेव्हा परत आले, तेव्हा त्यांना म्हैस खरेदी करणारी संबंधित व्यक्ती, म्हैस व वाहन दिसले नाही. बाजारात म्हशीचा शोध घेतल्यानंतरदेखील ती त्यांना सापडली नाही. अखेर स्वतःची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच सिंग यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी जुनावई पोलीस ठाणं गाठलं. पण घटना घडून एका दिवसानंतर तक्रार देण्यासाठी आल्यामुळे पोलिसांनी सिंग यांची तक्रार घेण्यास नकार दिला. त्यानंतर सिंग यांनी पोलीस आयुक्तालय गाठलं, व तिथे अर्ज दिला. हेही वाचा - चार दिवसांत आणखी एका चिमुकलीचा गेला बळी, बेपत्ता झाल्यानंतर घडलं भयानक अखेर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आदेशावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा नोंदवताना पोलिसांनी फसवणूक झाल्यानंतर संबंधित शेतकरी तात्काळ पोलीस ठाण्यात न आल्याचाही उल्लेख केलाय. या सर्व प्रकाराबाबत पोलिसांनी बोलण्यास नकार दिलाय. मात्र, गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. दरम्यान, 80 हजारांची म्हैस शेतकऱ्यांकडून अवघ्या 10 रुपयांत नेल्याने या प्रकरणाची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.