मुंबई, 28 ऑगस्ट : मुंबईत विवाहित महिलेने एक धक्कादायक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचा महिलेने रिक्षातच ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. ही घटना मुंबईत घडली आहे. रमजान शेख असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विवाहित महिलेला अटक केली आहे. तिचे वय 32 असून तिचे नाव जोहरा शाह असे आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - मागील एक वर्षापासून जोहरा शाह आणि रिक्षाचालक असलेला तिचा प्रियकर रमजान शेख (वय 26) हे दोन्ही लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होते. तसेच ते दोन्ही पवई आणि आरेच्या दरम्यान असलेल्या फिल्टरपाडा या परिसरात राहत होते. मागील काही दिवसांपासून जोहरा आणि रमजानमध्ये वाद सुरू होते. हाच वाद सोडवण्यासाठी दोन्हीही जण रिक्षातून पोलीस ठाण्यात जात होते. मात्र, वाटेतच रिक्षामध्ये विवाहित प्रेयसी जोहरा शाह हिने आपल्या प्रियकर रमजानचा गळा आवळून त्याची हत्या केली. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, जोहरा शाह हिचे याआधीही लग्न झाले होते. तसेच तिला सहा मुलेही झाली. मात्र, नंतर पती-पत्नीत वाद झाला आणि जोहराने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती रमजान खानसोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहू लागली. जोहराला आपला प्रियकर रमजानसोबत लग्न करायचे होते. सुरुवातीला रमजाननेही लग्न करण्यास होकार दिला. मात्र, नंतर तो सतत टाळाटाळ करू लागला. यातूनच दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. हेही वाचा - कपलसोबत अज्ञातांचं अजब कृत्य; तरुणाचं बोट दगडाने ठेचून तरुणीच्या भांगेत भरलं रक्त, अन् मग… हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही जण शनिवारी पोलीस ठाण्याकडे निघाले असता अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर रमजानने पोलिसांकडे जाण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या जोहराने थेट आपल्या ओढणीने रमजानचा गळा आवळत त्याची हत्या केली. तसेच प्रियकराच्या हत्येनंतर जोहरा शाह स्वत: पवई पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. आरोपी विवाहित महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.