बंगळुरू 12 जुलै : कर्नाटक पोलिसांनी एका 35 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याने आतापर्यंत 15 लग्नं केली आहेत. 2014 मध्ये पहिलं लग्न करणारा आरोपी महेश केबी नायक कधी स्वत:ला डॉक्टर तर कधी इंजिनियर सांगून मुलींना फसवत असे. मात्र प्रत्यक्षात तो अशिक्षित आहे. त्याच्या या चुकीमुळे तो पोलिसांच्या जाळ्यातही अडकला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याने महिलांसमोर स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी एक बनावट दवाखानाही उघडला होता. कर्नाटक पोलिसांनी आता या तरुणाला अटक केली आहे. त्याला चार मुलंही असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या आरोपीने 15 लग्नं का केली, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. हे करण्यामागे त्याचा खरा हेतू काय होता, हे तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल. पोलिसांचं म्हणणं आहे, की या महिलांशी लग्न केल्यानंतर हा व्यक्ती त्यांच्याकडील पैसे, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन बेपत्ता व्हायचा. तो या महिलांचं जीवन उद्ध्वस्त करण्याबरोबरच त्यांची आर्थिक फसवणूकही करायचा. यापूर्वीही काही प्रकरणांमध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते. नकली केसं लावून आला लग्नाला, समोर आले ते सत्य, उडाला एकच गोंधळ, पाहा Video पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूच्या बंशकरी भागात राहणारा महेश केबी नायक याने वेगवेगळ्या मॅट्रिमोनिअल साइट्सवर आपलं अकाऊंट उघडलं होतं. काही प्रोफाइलमध्ये त्यानी आपण डॉक्टर तर काहींमध्ये इंजिनियर असल्याचं सांगितलं होतं. या प्रोफाईलच्या माध्यमातून तो महिलांशी संपर्क साधायचा. डॉक्टर असल्याचा दावा केल्याने अनेकदा महिलाही त्याच्या जाळ्यात अडकल्या. यामुळेच त्याने हळूहळू अनेक महिलांना आपल्या जाळ्यात अडकवलं आणि आतापर्यंत एकूण 15 महिलांची फसवणूक करत त्यांच्यासोबत लग्न केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅट्रिमोनियल साइटद्वारे संपर्कात आलेल्या एका महिलेशी त्याचं संभाषण पुढे गेलं. महिला सुशिक्षितही होती. त्यामुळे ती आरोपी महेशसोबत इंग्रजीत बोलायची. महेशचं इंग्रजी चांगलं नव्हतं, त्यामुळे महिलेला त्याच्यावर संशय येऊ लागला. तिने अधिक तपास केला असता महेशचं पितळ उघडं पडलं. त्यानंतर तिने पोलिसांना त्याची माहिती दिली. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश सहसा अशा महिलांना आपली शिकार बनवायचा, ज्या फारशा शिकलेल्या नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.