मुंबई 11 एप्रिल : विनाकारण मुक्या प्राण्यांना त्रास देण्याची सवय काही लोकांना असते. कुत्र्याला कारला बांधून फरफटत नेणारे, तसंच कधी त्यांच्या शेपटीला फटाके बांधून त्रास देणाऱ्या लोकांचे तुम्ही या पूर्वी व्हिडिओ पाहिले असतील. मात्र, मुक्या प्राण्याला त्रास देणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. उंदराचा विनाकारण जीव घेतल्यामुळे एका व्यक्तीविरोधात उत्तर प्रदेशमधील बदायूँ न्यायालयात 30 पानांचं आरोपपत्र दाखल झालं आहे. उंदाराला जीवे मारल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं बहुधा देशातील हे पहिलेच प्रकरण आहे. बदायूँ येथील रहिवासी असलेल्या मनोज कुमार याच्यावर उंदराच्या शेपटीला दगड बांधून नाल्यात बुडवल्याचा आरोप आहे. 25 नोव्हेंबर 2022 रोजी ही घटना घडली होती. या वेळी प्राणी मित्र बिकेंद्र यांनी मनोजला विरोध केला होता. पण त्यानंतरही त्याने उंदीर मारला. बिकेंद्र यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि मनोजच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. तसेच बिकेंद्र यांनी उंदराचा मृतदेह हा नाल्यातून बाहेर काढला होता, त्यानंतर पोलिसांनी बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत (आयव्हीआरआय) या उंदाराचं पोस्टमॉर्टेम केलं होतं. महिलेच्या मृतदेहासोबत व्यक्तीचं संतापजनक कृत्य; VIDEO पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल आयव्हीआयआरचे डॉ. अशोक कुमार आणि डॉ. पवन कुमार यांनी उंदराच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केलं. त्यावेळी मृत्यूचं कारण गुदमरणं असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी मनोजला अटक केली होती, सध्या तो जामिनावर बाहेर आहे. त्यातच आता त्याच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल झालंय. सोमवारी (10 एप्रिल 2023) न्यायालयानं आरोपी मनोज याच्याविरोधात 30 पानांचं आरोपपत्र दाखल करून घेतलं. आता हे प्रकरण न्यायालयात चालणार आहे. याबाबत, बदायूँचे पोलीस निरीक्षक राजेश यादव यांनी सांगितलं की, ‘पोस्टमॉर्टमच्या अहवालात उंदराला क्रूरपणे मारल्याचं समोर आलंय. त्यामुळे आरोपी मनोजवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय.’ दुसरीकडे उंदीर मारून कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचं आरोपी मनोजचं म्हणणं आहे. ‘हा उंदीर त्याचं नुकसान करत होता. उंदीर मारल्यामुळे कारवाई होत असेल, तर बकरी, कोंबडा मारल्यानंतरसुद्धा गुन्हा दाखल व्हायला हवा,’ असंही तो म्हणाला होता. मात्र, या प्रकरणी नंतर त्याने माफी मागितली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय? बरेली आयव्हीआयआरचे जॉइंट डायरेक्टर डॉ. के. पी. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘उंदराचं पोस्ट मॉर्टेम करणाऱ्या टीमला तपासणीत उंदराचं फुफ्फुस खराब झाल्याचं आढळून आलं आणि तिथे सूजदेखील होती. यकृतात संसर्ग झाला होता. यावरून उंदराचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचं स्पष्ट होतंय. उंदरानं मृत्यूपूर्वी जोरात श्वास घेतल्यानं त्याच्या फुफ्फुसाची नळी फाटली होती.’दरम्यान, या प्रकरणाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मुक्या प्राण्यांना त्रास देणाऱ्यांसाठी हा चांगला धडा आहे, अशा प्रतिक्रियाही काहींनी दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.