भोपाळ, 24 सप्टेंबर : चंडीगड विद्यापीठात शिकणाऱ्या काही विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याची बातमी समोर आल्याची धक्कादायक घटना असतानाच आता मध्यप्रदेशातील भोपाळ येथून एक संतापजनक प्रकरण उघडकीस आले आहे. याठिकाणी एका महाविद्यालयातील बाथरुममध्ये विद्यार्थिनीचा व्हिडिओ बनवण्यात आल्याचे समोर आले आहे. भोपाळमधील एका आयटीआय कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये कथित व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले आहे की, भोपाळमधील आयटीआय कॉलेजच्या 3 माजी विद्यार्थ्यांविरोधात वॉशरूममध्ये एका विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ शूट करून तिला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन आरोपींपैकी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अशोका गार्डन ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, हे तीन आरोपी विद्यार्थिनीचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडे पैशांची मागणी करत असल्याचे समजत आहे. कॉलेजमध्ये एका कार्यक्रमादरम्यान मुलगी कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये गेली होती, तेव्हा या तीन आरोपी विद्यार्थ्यांनी तिचा व्हिडिओ बनवला. याप्रकरणी आयपीसीच्या कलम 384 आणि आयटी कायद्याच्या 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
चंदीगड विद्यापीठातील प्रकरण काय - चंडीगड विद्यापीठात शिकणाऱ्या काही विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याची बातमी समोर आल्यानंतर मागच्या शनिवारपासून जोरदार विरोध प्रदर्शनं सुरू होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोलीस आणि प्रशासनाने ही बाब फेटाळून लावली. या प्रकरणी एक विद्यार्थिनी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली असून, आयपीसी कलम 354 सी आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा - चंदीगडनंतर IIT मुंबईत धक्कादायक प्रकार, बाथरुममध्ये विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ बनविल्याचा कर्मचाऱ्यावर आरोप आपल्या देशात महिला रोजच अशा प्रकारच्या छळाला मोठ्या प्रमाणावर बळी पडतात. अनेक वेळा महिलांना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवून त्यांचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जातात. यासारखे प्रकार खरं तर कुठे घडू नये, पण जर तशी परिस्थिती उद्भवली तर कायद्याच्या आधाराने महिला तक्रार नोंदवू शकतात.