पुणे 30 मार्च : असं म्हणतात की, वास्तवदर्शी चित्रपट हे समाजाचा आरसा असतात. म्हणजेच आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या चित्रपटांची निर्मिती केली जाते. तर, या उलट कधी-कधी असंही होतं की काल्पनिक चित्रपटांपासून प्रेरणा घेऊन काहीजण वास्तविक जीवनात चांगली-वाईट कृत्यं करतात. पुण्यामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. 'दृश्यम' या गाजलेल्या चित्रपटातून आयडिया घेऊन पुण्यातील तीन व्यक्तींनी एका मार्केटिंग एजन्सीच्या कर्मचाऱ्याकडून 47 लाख रुपये लुटले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी पीडित कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटले होते. तीन आरोपींपैकी एकजण पूर्वी याच मार्केटिंग एजन्सीशी संबंधित होता. 'इंडियन एक्सप्रेस'नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
ही कसली चोरी करण्याची पद्धत; भयानक पद्धतीने लाखो रुपये लुटले, एकच खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित व्यक्ती मंगलपुरी गोस्वामी हे पिंपरी चौकातील पन्ना मार्केटिंग एजन्सीमध्ये गेल्या 30 वर्षांपासून काम करत आहेत. ज्या दिवशी लुटीची घटना घडली त्या दिवशी ते स्कूटरवर रोकड घेऊन बँकेकडे जात होते. सकाळी 11.30 च्या सुमारास नाना पेठेतील आझाद चौकाजवळ दोघांनी गोस्वामींना अडवलं. त्यातील एकानं धारदार शस्त्र दाखवून रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर हे दोघे दुचाकीवर फरार झाले.
गोस्वामी यांनी 23 मार्च रोजी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. गोस्वामी यांच्या तक्रारीनंतर असं निदर्शनास आलं की, हृषीकेश गायकवाड, किरण अशोक पवार आणि आकाश कपिल गोराड या एकाच परिसरात राहणाऱ्या तीन व्यक्ती आरोपी आहेत. तक्रार आल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी तपासासाठी शोध पथकं तयार केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पदरित्या फिरताना दिसणाऱ्या ऑटोरिक्षाचा पोलिसांनी माग काढला. आरोपी गायकवाड या ऑटोमध्ये बसलेला दिसला. त्याला मंगळवारी (28 मार्च) अप्पर इंदिरानगर येथून अटक करण्यात आली तर इतर दोघांना बुधवारी (29 मार्च) पहाटे ताब्यात घेण्यात आलं.
नाशिक बँकेच्या भिंतीला भगदाड पाडलं, दरोडा टाकणारच होते, पण झाला मोठा पोपट!
तंबाखू कंपनीशी संबंध असलेल्या मार्केटिंग एजन्सीमध्ये आरोपी गायकवाड हा पूर्वी सेल्समन म्हणून काम करत होता. एका भांडणात सहभागी झाल्यामुळे त्याला ऑक्टोबर 2022 मध्ये नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं, असं चौकशीत समोर आलं आहे. "गायकवाडनं पन्ना मार्केटिंग एजन्सीमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे तक्रारदार गोस्वामी दररोज बँकेत मोठी रोकड घेऊन जातात, याबाबत त्याला माहिती होती. गायकवाडनं किरण पवार आणि आकाश गोराड यांच्या मदतीने रोकड लुटण्याचा कट रचला," अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
23 मार्च रोजी आरोपी गायकवाड सकाळी नऊच्या सुमारास ऑटो रिक्षानं पन्ना मार्केटिंग एजन्सीमध्ये आला होता. त्यानंतर पवार, गोराड हेही घटनास्थळी पोहोचले. गायकवाडनं त्या दोघांना गोस्वामी रोख रक्कम बँकेत घेऊन जात असल्याचं दाखवले आणि तो नंतर त्याच्या घरी अशा ठिकाणी बसला की जिथे सीसीटीव्हीमध्ये तो दिसेल. घटना घडली त्यावेळी आपण घरीच होतो, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनं ही कृती केली. मात्र, विविध ठिकाणांहून सीसीटीव्ही फुटेजचे सुमारे 500 व्हिडिओ जमा केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची उकल केली आणि आरोपी गायकवाडला अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून आतापर्यंत 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune crime, Theft