Home /News /coronavirus-latest-news /

जागतिक आरोग्य संघटनाही भारताच्या मदतीसाठी सरसावली, सद्यस्थितीबाबत व्यक्त केली चिंता

जागतिक आरोग्य संघटनाही भारताच्या मदतीसाठी सरसावली, सद्यस्थितीबाबत व्यक्त केली चिंता

भारताला हजारो पोर्टेबल ऑक्सिजन मशीन्ससह (Portable Oxygen Machines) आवश्यक ती सर्व साधन सामग्री पाठवण्यात येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization- WHO) सांगितलं आहे.

नवी दिल्ली 27 एप्रिल: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Second Wave of Corona) भारतात उद्भवलेली परिस्थिती हृदयद्रावक आहे. हे संकट दूर करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना सर्वतोपरी मदत करत असल्याचं संघटनेचे (World Health Organization- WHO) प्रमुख टेड्रोस घेब्रेयसेस (Tedros Ghebreyesus) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलं. भारतातील परिस्थितीबाबत त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. भारताला हजारो पोर्टेबल ऑक्सिजन मशीन्ससह (Portable Oxygen Machines) आवश्यक ती सर्व साधन सामग्री पाठवण्यात येत असल्याचं घेब्रेयसेस यांनी स्पष्ट केलं. जागतिक पातळीवर कोरोनाची स्थिती गंभीर होत असून गेल्या नऊ आठवड्यांपासून कोरोनाबाधितांची (Corona Patient) संख्या सातत्यानं वाढतच आहे. तसंच गेल्या सहा आठवड्यांपासून मृतांची संख्याही वाढत असल्याचं घेब्रेयसेस यांनी सांगितलं. जागतिक पातळीवर मागील वर्षी पहिल्या पाच महिन्यात जेवढे कोरोना रुग्ण आढळले तेवढे रुग्ण गेल्या एका आठवड्यात आढळले असल्याचंही त्यांनी नमूद केलं. भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या अतिशय वेगानं वाढत असून दररोज सरासरी तीन लाख रुग्णआढळत आहेत. भारतात गेल्या 24 तासांत 3लाख 23 हजार144 रुग्णांची नोंद झाली, तर 2771 रुग्णांचा मृत्यू झाला. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे.त्यातच ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यानं ऑक्सिजनअभावी मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळं सध्या भारतात अत्यंत विदारक स्थिती उद्भवली आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत सध्या जगात चौथ्या स्थानावर आहे. सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असून तिथं आतापर्यंत या आजारानं पाच लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर त्यानंतर ब्राझील आणि मेक्सिको इथं सर्वाधिक रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत भारताला मदत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचं टेड्रोस यांनी सांगितलं. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, प्री फेब्रिकेटेड मोबाइल फिल्ड हॉस्पिटल आणि प्रयोगशाळा यासह आवश्यक उपकरणे आणि इतर मदत दिली जात आहे. त्याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेनं दोन हजारहून जास्त कर्मचारी भारतात काम करण्यासाठी पाठवले आहेत. लसीकरण मोहिमेसह आरोग्य सेवा देण्यासाठी हे कर्मचारी मदत करतील, असंही टेड्रोस यांनी सांगितलं.जगभरातील इतरही अनेक देशांनी भारताला मदत पाठवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, सौदी अरेबिया आदी अनेक देशांचा समावेश आहे. या देशांनी ऑक्सिजन मशीन्स, औषधे आदी मदत भारताला पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Who

पुढील बातम्या