वॉशिंग्टन 28 मे : कोरोनाविरोधातील (Coronavirus) लढ्यात लसीकरण (Vaccination) हे एक महत्त्वाचं शस्त्र मानलं जात आहे. त्यामुळे, अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी यासाठी सर्वच सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी तर लस (Corona Vaccine) घेणाऱ्यांसाठी विशेष भेटवस्तूही ठेवण्यात आल्या आहेत. अशाच एका लॉटरीमुळे (Covid Lottery) एक महिला रातोरात करोडपती बनली आहे. या 22 वर्षीय तरुणीला सरकारतर्फे लसीकरण मोहीमेला प्रमोट करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉटरी योजनेची पहिली विजेता म्हणून निवडण्यात आलं आहे. ही तरुणी अमेरिकेच्या ओहियोमधील (Ohio) आहे. याशिवाय एका 14 वर्षाच्या विद्यार्थ्यालाही पूर्ण स्कॉलरशिप दिली गेली आहे. म्हणजेच आता त्याला आपल्या संपूर्ण कॉलेजच्या शिक्षणादरम्यान एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.
लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकारनं नुकतीच ही योजना सुरू केली आहे. याच अंतर्गत पहिल्या पुरस्कार विजेत्याची गुरुवारी घोषणा झाली. ओहियोचे गर्व्हनर माइक डिवाइन (Mike DeWine) यांनी सांगितलं, की पहिलं बक्षीस जिंकणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला तब्बल साडे सात कोटी रुपये मिळणार आहेत. तिनं सध्या लसीचा एक डोस घेतला आहे.
रातोरात करोडोंची मालकीण झालेल्या Abbigail Bugenske हिला विश्वासच बसत नाहीये, की लशीच्या एका डोसनं तिला इतकं काही मिळवून दिलं. तिनं सांगितलं, की मला बक्षीस मिळालं आहे, हे माहिती झालं तेव्हा मी एक जुनी गाडी विकत घेण्यासाठी निघाले होते. मात्र, आता मी नवी गाडी विकत घेऊ शकते. तर, स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्याचे पालकही भरपूर आनंदी आहेत.
या योजनेला सुरुवात झाली तेव्हा माइक डीवाईन यांनी सांगितलं,की याचा उद्देश लोकांना लसीकरणासाठी प्रेरित करणं हा आहे. कारण बहुतेक लोक यात रस दाखवत नाहीत. त्यांनी सांगितलं,लॉटरीच्या माध्यमातून अशा पाच लोकांची निवड केली जाईल, ज्यांनी लसीचा कमीत कमी एक डोस घेतला आहे. ते म्हणाले, की या योजनेमुळे काही लोक असंही म्हणू शकतात की मी वेडा झालोय आणि सरकारी पैसे वाया घालवत आहे. मात्र, त्यांनी हे समजून घ्यायला हवं, की जीव वाचवण्यासाठी लस उपलब्ध आहे, तरीही आपण लस घेत नसू तर काय होईल?
विजेत्यांच्या घोषणेदरम्यान माइक डीवाईन म्हणाले, की आम्ही लस घेणाऱ्यांना मोफत बिअरचा पर्यायही (Free Beer Offer) देऊ शकत होतो. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नसता. ते बिअर पिऊन टीव्हीवर आपला आवडता शो पाहात बसले असते. त्यामुळं, आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. ओहियोमध्ये लसीकरणाचा वेग अपेक्षेनुसार नसल्यानं लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी ही लॉटरी ठेवण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine cost