नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : Coronavirus वर एकमेव आशादायक उपाय असलेलं Covid vaccien अर्थात कोरोना लस कधी येणार याविषयी जगभरात वेगवेगळ्या तारखा जाहीर होत आहेत. पण आता बिल गेट्स यांनी पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत किमान 3 लशी बाजारात येतील, अशी आशा दाखवली आहे.
कोरोना लसनिर्मितीमध्ये गुंतलेल्या 6 पैकी किमान तीन संस्थांच्या लशी पुढच्या वर्षीपर्यंत प्रत्यक्षात येतील. भारतात लशीची निर्मिती होईल, असं गेट्स म्हणाले. ते टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी लशीबद्दलचं त्यांचं मत व्यक्त केलं.
रशिया आणि चीनमध्ये तयार होणाऱ्या लशींपेक्षा पाश्चिमात्य देश तयार करत असलेली लस अधिक विश्वासार्ह वाटते, कारण पाश्चिमात्य देशांमध्ये लस निर्मितीपूर्वीच्या चाचण्यांचे निकष अधिक कठोर आणि दर्जात्मक आहेत. त्यामुळे याच लशींकडून जगाला जास्त आशा आहे, असंही गेट्स म्हणाले.
कोरोना लशीच्या निर्मितीमागे भारताची भूमिका जगात फार महत्त्वाची ठरणार आहे. कारण लशीचं संशोधन प्रामुख्याने पाश्चिमात्य देशात होत असलं तरी या संशोधकांबरोबर काही भारतीय कंपन्यांनी लशीच्या उत्पादनासाठीचे करार केले आहेत आणि भारत कोरोना लशीचं उत्पादन करणारा जगातला सर्वात मोठा देश ठरू शकतो, असंही गेट्स म्हणाले.
बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक तर आहेतच पण जागतिक आरोग्य विकासाचे अनेक उपक्रम राबवणारे दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात.
भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने विकसित केलेली कोरोना लस निर्माण करण्याचा करार केला आहे. सीरम इन्स्टिट्यूट जगात सर्वाधिक लशींचे डोस निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवून आहे. याचा फायदा भारताला होईलच. शिवाय इतर विकसनशील देशांनासुद्धा या लसनिर्मितीचा लाभ होईल.
पण सीरमचे प्रमुखे आदर पुनावाला यांनी काल दिलेल्या एका मुलाखतीत कोरोना लस सर्वांपर्यंतच पोहोचण्यासाठी चार वर्षं लागतील, असं वक्तव्य केल्याने लशीची आशा मावळली होती.
त्या पार्श्वभूमीवर जगभरातील लसनिर्मितीवर लक्ष ठेवून असणाऱ्या बिल गेट्स यांनी दिलेली वेळ आशा वाढवणारी आहे. किमान तीन संस्थांनी संशोधित केलेल्या कोरोना लशी पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रत्यक्षात येतील, असं त्यांनी म्हटलं आहे.