नवी दिल्ली 13 जुलै: ‘जगभरातील पूर्ण लसीकरण झालेल्या म्हणजेच ज्यांनी लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतले आहेत अशा व्यक्तींनाही कोविड-19 ची (Covid-19) लागण होत आहे असे रिपोर्ट आम्हाला मिळाले आहेत. त्यातही बहुतांश जणांना कोविड-19 च्या डेल्टा व्हेरियंटची लागण होत आहे. पण एक गोष्ट दिलासादायक आहे की यापैकी बहुतांश रुग्णांमध्ये कोविडची लक्षणं खूप कमी प्रमाणात किंवा अजिबात दिसलेली (Asymptomatic) नाहीत,’ अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या, ‘जगातील काही देशांमध्ये अजून पुरेसं लसीकरण झालेलं नाही त्यामुळे तिथे हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण अजूनही जास्त आहे आणि तिथं डेल्टा व्हेरियंटची (Delta Variant) लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे. तिथं डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग वेगाने पसरत आहे.’ सावध राहा! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला या तारखेपासूनच सुरुवात; शास्त्रज्ञाचा दावा कोविड-19 ची लागण होऊ नये म्हणून ज्यांनी पूर्ण लसीकरण करून घेतलं आहे त्यांनाही जगभर डेल्टा व्हेरियंटची लागण होत आहे. पण लसीकरणामुळे त्यांची प्रकृती गंभीर आजारी होत नाही किंवा या नव्या विषाणूची लागण झाल्याने मृत्यू होण्याचं प्रमाणही खूप कमी आहे. अमेरिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय की गेल्या काही काळात झालेली कोविड हॉस्पिटलायझेशन (Hospitalization) आणि मृत्यूची प्रकरणं लक्षात घेता ही लागण लसीकरण न केलेल्या व्यक्तींनाच झाली होती असं आमच्या लक्षात आलं आहे. लसीकरण झाल्यानंतर कोविडची लागण होण्याचं प्रमाण अगदीच नगण्य आहे. लसीकरण केल्यानंतरही जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि त्यांचा मृत्यू झाला अशा रुग्णांपैकी 75 टक्के 65 वर्षांवरील आहेत, असं निरीक्षण सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शनने नोंदवलं आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसुस म्हणाले, ‘डेल्टा व्हेरियंट वेगाने जगभर पसरत आहे. त्यामुळे कोविड-19 ची लागण होणाऱ्या रुग्णांची आणि मृतांची संख्या प्रचंड वाढत आहे. जरी सगळ्या जगात समान पद्धतीने हा नवा डेल्टा संसर्ग पसरत नसला तरीही त्याचा प्रसार होतो आहेच. काही देशांनी लसीकरण (Vaccination) करून घेतलं आहे आणि काही देशांमध्ये खूपच कमी लसीकरण झालं आहे. अशा द्विधा स्थितीत आता आपण आहोत. हा विषाणू अतिशय वेगाने पसरत असून ज्यांनी लस घेतलेली नाही अशांना आपलं लक्ष्य करत आहे.’ कोरोना काळात मुलांना या डोळ्याच्या आजाराचा धोका; ऐका तज्ज्ञांचा सल्ला स्वामीनाथन यांनी पुन्हा एकदा जगातील नागरिकांना मास्क वापरण्याचा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, ‘ जरी तुम्ही लस घेतली असली तरीही कोविड-19 चा संसर्ग तुम्हाला होऊ शकतो आणि तुमच्यामुळे इतरांपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे मास्क वापरा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत रहा. पण लसीकरणामुळे हॉस्पिटलायझेशन आणि कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट झाली आहे हे मात्र नक्की. काही अभ्यासांतून असं लक्षात आलंय की लसीकरण न केलेल्यांच्या तुलनेत लसीकरण केलेल्या व्यक्तीला कोविड झाला तर तो कमी प्रमाणात विषाणूचा संसर्ग पसरवतो. लसीकरणाचा परिणाम आणि त्याचा संसर्ग पसरण्यावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी अधिक अभ्यास केला गेला पाहिजे.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.