नवी दिल्ली 22 मार्च : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनेक मोठे नेते आणि कलाकारही कोरोनाच्या विळख्यात आल्याचं वृत्त वारंवार समोर येत आहे. अशातच आता उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह (Tirath Singh Tests Positive For Corona) आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. तीरथ सिंह रावत यांनी स्वतः ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी व्यवस्थित असून मला कोणताही त्रास होत नाहीये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या देखरेखीत मी स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. तुमच्यातील जे लोक मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि सावध राहावं असंही ते म्हणाले आहेत.
मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत तीरथ सिंह -
फाटक्या जीन्सच्या वापरावरून तिरथ सिंह रावत यांनी महिलांच्या संस्कारांबाबत भाष्य केले होते. त्यांनी यावेळी एक अनुभव सांगितला होता. ते असं म्हणाले की, 'मी एकदा विमानप्रवासात होतो. त्यावेळी एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन बसली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स (Ripped Jeans) घातलेली होती. यावेळी मी त्यांना विचारलं की कुठे जायचं आहे.? यावेळी महिलेने दिल्लीला जात असल्याचं म्हटलं. तिने अशी देखील माहिती दिली की, तिचे पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि महिला स्वयंसेवी संस्था चालवते'.
ते पुढे असं म्हणाले की, 'माझ्या मनात विचार आला, जी महिला NGO चालवते आणि फाटलेली जीन्स घालते, ती समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल लागेल.' त्यांनी पुढे असं देखील म्हटलं की पाश्चिमात्य संस्कृतीपासून दूर राहावं लागेल. या विधानानंतर तीरथ सिंह यांच्यावर सर्वच स्तरांमधून टीका होत होती. मुख्यमंत्रीपदाचा कारभार हातात घेताच आपल्या काही वादग्रस्त विधानांमुळे तीरथ सिंह चर्चेचा विषय ठरले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chief minister, Corona, Coronavirus, Covid-19 positive, Tirath singh rawat, Uttarakhand