वॉशिंग्टन, 7 मार्च : कोरोना व्हायरसच्या (Corona virus) विळख्यात जग अडकून आता एक वर्ष उलटले आहे. व्हायरसच्या संसर्गापासून जगाचे संरक्षण करण्यासाठी कोरोना लसीकरणासह (Corona vaccination) जगभरात सुरुवात झाली आहे. भारतामध्ये याचा तिसरा टप्पा सुरु असून अमेरिका तसंच युरोपीयन देशांमध्ये हा कार्यक्रम जोरात सुरु आहे.
कोरना संसर्गाशी संबंधित कोणत्याही बौद्धिक संपदेचे हक्क (intellectual property rights) सोडून द्यावे असा प्रस्ताव भारत, दक्षिण आफ्रिकेसह काही देश जागतिक व्यापार संघटनेकडे (World Trade Organization) सादर करणार आहेत. हा प्रस्ताव स्विकारु नये अशी मागणी अमेरिकेच्या सिनेटर्सनी अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्याकडे केली आहे.
काय आहे आक्षेप?
अमेरिकेतील चार सिनेटर्सनी अध्यक्ष बायडेन यांना याबाबत पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी भारताच्या प्रस्तावावरील आक्षेप मांडले आहेत. ‘हा प्रस्ताव मंजूर झाल्यास अमेरिकन कंपन्यांनी कोरोना लशीच्या निर्मितीसाठी जे कष्ट घेतले ते वाया जातील. तसंच त्यामुळे लसनिर्मिती कंपन्यांना महत्त्व प्राप्त होऊन त्यांच्यात मोठी वाढ होईल,’ असा आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
‘हा प्रस्ताव मंजूर झाल्यास लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वात जलद गतीनं तयार केलेल्या लस निर्मिती प्रक्रियेला खिळ बसेल. अमेरिकेच्या बौद्धिक संपदेवर हक्क सांगण्याची चूक काही देश या प्रस्तावात करत आहेत,’ असा दावाही या सिनेटर्सनी केला आहे.
‘एक जागतिक महासत्ता या नात्यानं अन्य देशांची व्हायरसच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी आपण त्यांना मदत करायला हवी. मात्र आपल्या बौद्धिक संपदेचे हक्क सोडून देऊन आपले व्हायरस मुक्ती अभियान यशस्वी होणार नाही. यामुळे जगातील आणि अमेरिकेमधीलही प्रश्न आणखी गंभीर होतील,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
( वाचा : आता वेदनेपासून मिळणार सुटका, कोरोना चाचणीची अतिशय सोपी पद्धत आली समोर )
जगभरातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण तसंच कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या ही अमेरिकेत आहे. अमेरिकेत सध्या लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असून लवकरात लवकर देशातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे सरकारचे ध्येय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Coronavirus, Covid19, Fight covid, International, Joe biden