नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : देशात कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाचं प्रमाण पूर्वीच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी झालं असलं तरी सणासुदीच्या काळात संसर्ग वाढण्याचा धोका अजूनही कायम आहे. त्यातच बहुतांश ठिकाणी निर्बंध शिथील केल्यानं सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. तसंच कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन फारसं गांभीर्यानं केलं जात नसल्याचं चित्र आहे. दरम्यान, कोरोना विषाणूबाबत एका संशोधनातून (Research) मोठा खुलासा करण्यात आला आहे. काही लोकांवर अद्यापही कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे.
हैदराबाद येथील काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी आणि वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठातल्या संशोधकांना एका अभ्यासात असं दिसून आलं आहे, की देशाच्या विविध भागांत विखुरलेल्या लोकसंख्येला अजून कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे.
देशातल्या ओंगे आणि जरावा यांसारख्या आदिवासी (Trible) जमातींना अद्यापही कोरोनाचा धोका आहे. अर्थात हे केवळ एक उदाहरण म्हणता येईल. या दोन्ही आदिवासी जमाती भारताच्या मुख्य भूमीवरच्या नागरिकांपासून अलिप्त आहेत. सर्वसामान्यपणे या आदिवासी जमाती अंदमान आणि निकोबार बेटांवर (Andaman And Nicobar) आढळतात.
हे वाचा - कोरोनाला रोखणारा फॉर्म्युला तयार; व्हायरस मानवी पेशीमध्ये एंट्रीच करू शकणार नाही
सीएसआयआरचे कुमारसामी थंगराज यांच्यासमवेत संशोधन करणारे बीएचयूमधले प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांनी सांगितलं, `वेगवेगळ्या लोकसंख्येमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केल्यानं काही समस्या उद्भवू शकतात. विखुरलेल्या लोकसंख्येमध्ये संसर्गाचा धोका निश्चित करण्यासाठी 227 समूहांवर जीनॉमिक डेटाचा वापर केला गेला. यातले काही नागरिक कोरोना प्रति अधिक संवेदनशील असल्याचं आढळून आलं.`
हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार या 227 समूहांमधल्या 1600पेक्षा अधिक नागरिकांचा उच्च घनतेचा जीनॉमिक डेटा (Genomic Data) तपासण्यात आला. यात ओंगो आणि जरावा या जमातींमध्ये कोरोनाबाबत जोखीम दर अधिक असल्याचं आढळून आलं. हे रहिवासी संरक्षित भागात राहतात आणि त्यांना सामान्य जनतेशी संवाद साधण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका कमी असेल; मात्र या बेटांवरील रुग्णसंख्या पाहता या भागात बेकायदेशीर मार्गानं आलेले लोक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्यानं या नागरिकांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका आहे, असं म्हणता येईल.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, केंद्रशासित प्रदेश असलेल्या अंदमान आणि निकोबारमध्ये गुरुवारी (14 ऑक्टोबर) दोन नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता तेथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7637 झाली आहे. आतापर्यंत एकूण 7499 नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Research