बीजिंग 24 मे : जगभरात कोरोना विषाणूचा (Coronavirus) फैलाव होऊन आता जवळपास दीड वर्ष झालं; मात्र या विषाणूची उत्पत्ती कशी झाली, याचं नेमकं आणि पटणारं उत्तर अद्याप सापडलेलं नाही. दरम्यान, अमेरिकेच्या (USA) एका गुप्त अहवालात असा दावा करण्यात आला आहे, की कोरोनाचा जगभरात फैलाव होण्याच्या साधारण एक महिनाभर आधी चीनच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी' (Institute of Virology) या संस्थेतले तीन शास्त्रज्ञ नोव्हेंबर 2019 मध्ये आजारी पडले होते.
या शास्त्रज्ञांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. वॉल स्ट्रीट जर्नल (Wall Street Journal) या अमेरिकेच्या वृत्तपत्राने या गुप्त अहवालासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. अमेरिकेच्या या गुप्त अहवालात वुहान लॅबमधल्या (Wuhan Lab) आजारी पडलेल्या संशोधकांची संख्या, त्याचा कालावधी आणि हॉस्पिटलसंदर्भातली माहिती विस्तृत स्वरूपात देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भातल्या तपासाच्या पुढच्या टप्प्यातल्या चर्चेसाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक बैठक आयोजित केली आहे. नेमक्या त्याच सुमारास अमेरिकेचा हा गुप्त अहवाल उघड झाला आहे.
याआधी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) एक टीम कोरोना विषाणूशी संदर्भातल्या वस्तुस्थितीचा तपास करण्यासाठी वुहानला गेली होती. त्यावेळी या टीमने वुहान लॅबलाही भेट दिली होती. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं असं जाहीर केलं होतं, की वुहान लॅबमधून कोरोना विषाणू सगळीकडे पसरला असं म्हणण्यासाठी कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.
कोविडसारखी (Covid) लक्षणं दिसणारा पहिला रुग्ण वुहानमध्ये आढळल्याचं चीनने जागतिक आरोग्य संघटनेला आठ डिसेंबर 2019 रोजी सांगितलं, असं सीएनएनच्या वृत्तात म्हटलं आहे. चीनच्या (China) शास्त्रज्ञांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागल्याचं पहिलं वृत्त 'वॉल स्ट्रीट जर्नल'नेच प्रसिद्ध केलं होतं.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्याने 'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या ताज्या वृत्तावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही. मात्र त्यांनी सांगितलं, की चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यासंदर्भात, तसंच या महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांसंदर्भात अमेरिकेच्या जो बायडेन प्रशासनाकडे अनेक सवाल असून, त्यांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य सदस्य देशांसोबत अमेरिका सरकार कोरोना महामारीच्या उत्पत्तीसंदर्भात शोध लावण्याचं काम करत असून, त्यात राजनैतिक हस्तक्षेप नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
वुहान लॅबच्या शास्त्रज्ञांसंदर्भातली माहिती असलेल्या काही विद्यमान आणि पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी या गुप्त अहवालासंदर्भात वेगवेगळे विचार व्यक्त केले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितलं, की या अहवालासंदर्भात अधिक तपास होऊन त्याला पुष्टी मिळणं गरजेचं आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, ब्रिटन आणि अन्य देशांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कोविड-19 या रोगाच्या उत्पत्तीसंदर्भातल्या अभ्यासासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. हा विषाणू फैलावण्यास चीन कारणीभूत असल्याची शंका अमेरिकेने व्यक्त केली होती. अमेरिकेचे मागील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही कोरोना विषाणूचा उल्लेख चिनी विषाणू किंवा वुहान विषाणू असा करत होते. चीन जागतिक आरोग्य संघटनेला पूर्ण सहकार्य करत नसून, वुहान लॅबशी संदर्भातली माहिती चीनने लपवली आहे, असे आरोप ट्रम्प यांनी चीनवर केले होते. त्यावर चीनने आक्षेप घेतला होता.
सध्या उपलब्ध गुप्त माहितीतून असं दिसून येतं, की हा विषाणू खरंच नैसर्गिकरीत्याच पुढे आला असावा, कोणत्या तरी प्राण्याच्या माध्यमातून माणसात पोहोचला असावा; पण वुहान इन्स्टिट्यूटमधून झालेल्या लिकेजचा हा परिणाम असावा, ही शक्यता पूर्णतः नाकारता येत नाही. या वुहान लॅबमध्ये वटवाघळांवर कोरोना विषाणूसंदर्भात संशोधन सुरू होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Corona spread, Coronavirus, Wuhan