लखनऊ 06 मे : कोरोनानं (Coronavirus) संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. या महामारीनं अनेक कुटुंब उद्धवस्त केली आहेत. मात्र, आज जी बातमी समोर आली आहे, ती मन सुन्न करणारी आहे. कोरोनामुळे एक हसतं खेळतं कुटुंब पूर्णपणे उद्धवस्त केलं आहे. पाहाता पाहाता संपूर्ण कुटुंबाचाच कोरोनानं बळी घेतला आहे. या घटनेत एकाच आठवड्यात कुटुंबातील तीन सदस्यांचा कोरोनानं (Three Members of Family Die of COVID-19) मृत्यू झाला आहे. आता या कुटुंबात केवळ एक तीन वर्षाचा चिमुकला आणि त्याची वृद्ध आजी हे दोघंच शिल्लक राहिले आहेत. ही हृदयद्रावक घटना आहे, उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील. बुलंदशहरमधील लक्ष्मीनगर कॉलनीत राहाणाऱ्या वकील धर्मराज सिंह यांना एका आठवड्यापूर्वी खोकला आणि तापासह श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर नातेवाईकांनी त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. जेव्हा चाचणी केली गेली, तेव्हा ते कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याचं समोर आलं. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान सहा तासातच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीय या धक्क्यात सावरतच होते, तोपर्यंत धर्मराज यांच्या वहिनीचाही कोरोनानं मृत्यू झाला. साधनावर अंत्यसंस्कार होतात तोच धर्मराज यांच्या विधवा सुनेचंही कोरोनानं निधन झालं. आता कुटुंबात केवळ धर्मराज यांची वृद्ध पत्नी सुषमा आणि तीन वर्षाचा नातू राहिला आहे. या परिस्थितीमध्ये तीन वर्षाच्या नातवाचं संगोपन कसं करायचं असा मोठा प्रश्न सुषमा यांच्यासमोर उभा ठाकला आहे. यामुळे सुषमा यांनी सरकारकडे मदतीची मागणीही केली आहे. शहरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील जवळपास सगळ्या सदस्यांना कोरोनानं विळखा घातल्यानं परिसरात हा चर्चेचा विषय ठरत आहे. या घटना लोकांना विचार करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे, या कठीण काळात अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडणं आणि नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.