हैदराबाद, 12 जुलै : कोरोनाची दुसरी लाट
(Second wave of corona virus) अद्याप संपली नसल्याची चर्चा देशात सुरू असतानाच तिसरी लाट
(third wave) सुरू झाल्याची घोषणा अभ्यासकांनी केली आहे. हैद्राबाद विद्यापीठातील
(Hyderabad University) प्रसिद्ध भौतिकशास्त्र
(Physicist) आणि गणितज्ञ डॉ. विपीन श्रीवास्तव (
Dr.Bipin Shrivastav) यांनी गेल्या दीड वर्षातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा मॅट्रिक्सच्या (
Matrix) आधारे अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.
कोरोनाची दैनंदिन प्रकाशित होणारी आकडेवारी आणि पहिल्या दोन लाटांचे पॅटर्न यांचा तौलनिक अभ्यास केला असता, दुसरी लाट 4 जुलै रोजी सुरु झाली आहे, असं प्रसिद्ध अभ्यासक डॉ. बिपीन श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जशी परिस्थिती होती, तशीची परिस्थिती जुलैच्या पहिल्या आठवड्यात होती, असं डॉ. श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.
असं मांडलं गणित
लाटेची सुरुवात नेमकी कधी होते, हे समजण्यासाठी डॉ. श्रीवास्तव यांनी मुख्यत्वे तीन प्रकारच्या आकडेवारीचा उपयोग केल्याचं सांगितलं आहे. दैनंदिन आढळणारी रुग्णसंख्या, दैनंदिन बरे होऊन घरी जाणारी रुग्णसंख्या आणि दैनंदिन मृत्यू या तीन गोष्टींच्या आधारे लाटेची सुरुवात, कळस आणि लाट ओसरत असल्याचं सिद्ध करता येतं, असं त्यांनी म्हटलं आहे. जेव्हा नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ही बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा वाढू लागते, तेव्हा परिस्थिती गंभीर होत असल्याचं मानलं जातं. मात्र केवळ हा एकमेव निकष ग्राह्य धरता येत नाही. त्याबरोबरच जर दैनंदिन मृत्युंचंही प्रमाण वाढत असेल आणि हे सलग काही दिवस होत असेल, तर मात्र ती नव्या लाटेची सुरुवात मानली जाते. 4 जुलैपासून ही परिस्थिती दिसायला सुरुवात झाल्याचं या आकडेवारीतून आणि मॅट्रिक्समधून स्पष्ट दिसत असल्याचं डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितल्याची बातमी
‘टाईम्स ऑफ इंडिया’नं दिली आहे.
हे वाचा -
कोरोना लसीचा दुसरा डोस घेणं का आवश्यक आहे? जाणून घ्या
काळजी घ्या अन्यथा...
मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात धुणे, स्वच्छता बाळगणे यासारख्या गोष्टींचा नागरिकांनी अवलंब केला नाही, तर कोरोनाची तिसरी लाट काही दिवसांतच फोफावत असल्याचं दिसून येईल, असा इशारा डॉ. श्रीवास्तव यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.