बुलडाणा 07 मार्च : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा झपाट्यानं होऊ लागला आहे. त्यामुळे, चिंतेत वाढ झालेली असतानाच आता बुलडाण्याच्या मोताळा येथून एक अजब बातमी समोर आली आहे. इथे एका व्यक्तीनं स्वॅब दिलेला नसतानाच त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Report) आला आहे. हा प्रकार सहकार विद्या मंदिरातील कोविड केअर सेंटरमध्ये उघडकीस आला आहे. आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकरण -
पंडितराव कैलासराव देशमुख नामक व्यक्तीला खोकला जाणवल्यामुळे 25 फेब्रुवारीला ते तपासणीसाठी मोताऴा येथील कोविड केअर सेंटरमध्ये गेले. याठिकाणी त्यांच्या नावाची तसंच पत्ता आणि मोबाईल नंबर या गोष्टींची नोंद करण्यात आली आणि काही वेळानंतर स्वॅब देण्यासाठी या असं त्यांना सांगण्यात आलं. मात्र, पंडितराव पुन्हा तिथे गेलेच नाहीत. नंतर 5 मार्च रोजी कोविड सेंटरमधून एका कर्मचाऱ्यानं त्यांना फोन केला आणि तुमचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असं पंडितरावांना सांगितलं. मात्र, कर्मचाऱ्याचं हे बोलणं ऐकून पंडितराव स्वतःच बुचकळ्यात पडले. कारण, त्यांनी कोरोना चाचणीसाठी आपले स्वॅबच दिले नव्हते. याप्रकरणी पुढे त्यांनी आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणामुळं संताप व्यक्त केला आहे.
आरोग्य विभागाकडून इतका हलगर्जीपणा झाला कसा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्याचं झालं असं, की देशमुख यांनी नाव नोंदणी केल्यानंतर स्वॅब घेण्यासाठी त्यांच्या नावाची ट्यूब तयार करण्यात आली. मात्र, देशमुख तिथे पोहोचलेच नाहीत आणि त्यात दुसऱ्याच व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला. त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्हही आला. मात्र, आता ही व्यक्ती नेमकी कोण आहे, याचा शोध घेणं गरजेचं आहे. दरम्यान याप्रकरणी चौकशी सुरू आहे आणि दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती मोताळा तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांनी दिली आहे.