नवी दिल्ली, 3 जुलै : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने (corona) हाहाकार माजवला आहे. देशात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्यात. पहिल्या लाटेच्या तुलनेत भारतात दुसरी लाट जास्त भीषण होती. रुग्णांच्या संख्येने नवनवे उच्चांक गाठले तर मृतांची संख्याही खूप जास्त होती. कोरोनाचा विषाणू हा सतत बदलतोय, म्युटंट (mutant) होतोय त्यामुळे त्याचा प्रभाव देखील बदलतोय. कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. राज्यात दोन्ही लाटांमध्ये कोरोना बाधितांची आणि मृतांची संख्या ही देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक राहिली आहे. राज्यात गेल्या महिन्याभरापासून रुग्णसंख्या (covid patients) कमी होऊ लागली. त्यामुळे बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले होते. अनेक जिल्ह्यांमधील निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आले. मात्र, दुसऱ्या लाटेतून सावरत असताना आणि रुग्णसंख्या कमी होऊन परिस्थिती सामान्य होत असताना आणखी चिंता वाढवणारी बातमी आली. ती होती कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटची.
डेल्टा व्हेरियंट (delta variant ) हा कोरोनाचा म्युटंट झालेला विषाणू आहे. हा विषाणू तुलनेने जास्त घातक असून तो अँटीबॉडीजपासून (antibodies) स्वतःचा बचाव करू शकतो. कोरोनाच्या विषाणूला प्रतिकार करण्यासाठी नैसर्गिक पदधतीने अँटिबॉडिज तयार होतात किंवा लस दिल्यानंतर ती तयार होतात. त्यांच्यापासूनही डेल्टा व्हेरियंट स्वत:चा बचाव करू शकतो. तसेच या विषाणूमुळे संसर्ग वेगाने पसरतो. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी राज्य सरकारला खबरदारीचा इशारा दिलाय. त्यामुळे आज आपण डेल्टा व्हेरियंट किंवा कोरोनाच्या साध्या विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णामध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत. याबाबत लाईव्ह हिंदुस्थानने वृत्त दिलंय.
हे ही वाचा-Dispoject Safety Needle ने दिली जाणार कोरोना लस; भारतात लसीकरण आता अधिक सुरक्षित
ताप (fever) आणि खोकला ही सुरुवातीच्या टप्प्यातील कोरोनाची मुख्य लक्षणं होती. मात्र, दिवसेंदिवस त्यात बदल होत गेले. या दोन लक्षणांनंतर डोकेदुखी (headache) आणि घसा खवखवणं, दुखणं अशी लक्षणं बऱ्याच रुग्णांना जाणवत होती. त्यानंतर डायरिया, डोळे लाल होणं, अंगदुखी, चव आणि वास घेण्याची क्षमता जाणं अशी लक्षणं कोरोना रुग्णांमध्ये दिसत होती. मात्र, कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिसणारं मुख्य लक्षण नाक वाहणं हे आहे. म्हणजे कोरोनाच्या इतर लक्षणांसोबतच या रुग्णांना सर्दी होऊन नाक सतत वाहतंय. त्यामुळे हे डेल्टा व्हेरियंटचं एक महत्वाचं लक्षण असल्याचं म्हटलं जातंय. पावसाळा सुरू झालाय, त्यामुळे सर्दी-खोकला आणि व्हायरल होणं नॉर्मल आहे. मात्र, तरीही तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलंय. तसेच कोरोनाच्या इतर लक्षणांसोबत नाक वाहत असेल तर हा डेल्टा व्हेरियंट असू शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
देशात लसीकरण सुरू आहे. त्यामुळे लस घेतल्याने कोरोनाचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता तुलनेने कमी आहे. मात्र, डेल्टा व्हेरियंट हा घातक असून त्याच्याबद्दल इतर माहिती गोळा करण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपण लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही स्वतःची काळजी घेत कोरोनाचे नियम पाळणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Health