दापोली, 23 एप्रिल : स्मशानातील निखारे गेले काही दिवस धगधगते असून काही केल्या स्मशानभूमीतील धगधगते निखारे विझण्याचे नाव घेत नाहीत. दिवसागणिक वाढणाऱ्या मृत्यूमुळे लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. मृत्यूदर चार पट वाढला असून दिवसागणिक 4 ते 5 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ दापोली नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यावर येऊन ठेपली आहे.
एकीकडे रुग्णांना बेड मिळणे मुश्किल झालं आहे, तर दुसरीकडे प्रेताला अग्नी देण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा कमी पडत आहे. आरोग्य यंत्रणेप्रमाणेच प्रेताला अग्नी देणा-या कर्मचा-यावरील ताण वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार माजला असून जिल्ह्यात काळीज पिळवटून टाकणारा मृत्यूदर वाढला आहे. वाढत्या मृत्यूदराने स्मशानातील निखारे गेले काही दिवस कायम धगधगत आहे. वाढत्या मृत्यूदराने निखारे विझवण्याचं नावच घेत नाहीत. त्यामुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांना 24 तास सतर्क राहण्याची वेळ आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे बळी दापोलीत ठरले आहेत. त्यामुळे दापोली तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दापोलीत 10 दिवसात 40 कोरोना बाधितांवर दापोली न.पं. कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच दररोज चार ते पाच लोकांचा मृत्यू होण्याची घटना घडत आहे. दापोली तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच मृत्यूचे प्रमाणही वाढले असल्याचे समोर येत आहे. एकीकडे कोरोनामुळे माणूसकी हरवल्याचे चित्र असताना दापोली नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून कोरोनाने मृत्यू पावलेल्या रूग्णांवर अंत्यसंस्कार करून माणूसकी जपत असल्याचे दिसत आहे.
गेल्या वर्षी जेवढे मृत्यू झाले होते, तेवढे मृत्यू एप्रिल महिन्यात झाले आहेत. 10 दिवसात 40 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून हे खुपच गंभीर आहे. मरणाचा सुकाळ झाल्याने माणुसकी हरवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गावबंदी त्याचबरोबर मृतदेह नाकारणे, अंत्यसंस्कारास नकार देणे, गावकऱ्यांचा विरोध यासारख्या अनेक घटना गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी घडल्या आहेत.
हे ही वाचा-...तर जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन तुटवडा निर्माण झालाच नसता - विखे पाटील
अशा कठीण काळातही दापोली नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून माणुसकी जपली जात असून कोरोनाबाधित मृत रूग्णांंवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. दापोली नगरपंचायतीमधील आरोग्य स्वच्छता दूत मंगेश जाधव, संदीप डिंगणकर (मुकादम), दिपक गोरीवले, राजेश टांक, शैलेश पवार, राजेश जाधव, सचिन घाग, श्रीकांत पवार, अनिल चोरगे, दिपक भांबीड, संजय धोपट, गजानन म्हसकर, संतोष गायकवाड, स्वप्नील वाघमारे, प्रविण गमरे आदी कर्मचारी अंत्यसंस्कारासाठी 24 जीव धोक्यात काम करीत आहेत.
कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावताना आपलं काही बरं-वाईट झाल्यास आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी शासनानेे घ्यावी. सर्व कर्मचारी अस्थायी असल्याने आम्ही केलेले कोविडचे काम लक्षात घेऊन सरकारने आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा अशी विनंती दापोली नगरपंचायत अस्थायी सफाई कर्मचाऱ्यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.