नवी दिल्ली, 08 जानेवारी : आता भारतातही (India) कोरोना विषाणूवरील लसीकरण (Corona Vaccination) सुरू होणार आहे. मात्र लस घेण्याआधीच त्याबाबत अनेक प्रश्न , शंका उपस्थित केल्या जात आहेत. अशाच प्रश्नांपैकी एक म्हणजे लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाव्हायरसचा (coronavirus) संसर्ग होणार नाही याची हमी काय ? काही तज्ज्ञांनी या प्रश्नानचं निरसन केलं आहे.
लस टोचल्यानंतर शरीरात काय काय होतं, त्याचे कसे परिणाम होतात याबाबत न्यूयॉर्क टाईम्समध्ये वैज्ञानिक आणि तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली आहे.
लस टोचल्यानंतर शरीरात नेमकं काय घडतं?
इंजेक्शनद्वारे ही लस (Covaccine) शरीरात टोचली जाते. शरीरात गेल्यावर ही लस शरीरातील बी पेशींना सक्रीय करते आणि शरीरातील रोग प्रतिकारक पेशी प्रभावीपणे आपलं काम करू लागतात.
एवढंच काम ही लस करते का?
नाही, शरीरातील रोग प्रतिकारक यंत्रणा मजबूत केल्यानंतर ही लस स्पाईक प्रोटीन ओळखून त्याविरुद्ध वेगानं काम सुरू करते आणि या विषाणूला पेशींमध्ये पोहोचण्यापासून रोखते. त्याचवेळी पेशी अँटीबॉडीज बनवून पॅथोजनला रोखण्याचं काम करतील. या संपूर्ण प्रक्रियेत विषाणू कमकुवत होईल आणि तो शरीरातील रोग प्रतिकारक यंत्रणेला कोणताही धोका पोहोचवू शकणार नाही. यामुळं पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाही.
धक्कादायक! Corona vaccine घेताच डॉक्टरला लकवा; आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू
अँटीबॉडीज तयार होतात का?
शरीरात गेल्यावर ही लस शरीरातील बी पेशींना सक्रीय करते आणि त्या पेशी विषाणू विरुद्ध लढा सुरू करतात. विषाणूच्या स्पाईक प्रोटीनवर हल्ला करतात. त्याचवेळी बी पेशी अँटीबॉडीज तयार करू लागतात. त्यामुळे शरीरात असलेला विषाणू काही करू शकत नाही, कारण आता शरीर त्याचा सामना करण्यास सज्ज झालेलं आहे.
28 दिवसानंतर दुसरा डोस घेणं का जरूरी आहे ?
कोरोना लशीचे दोन डोस आवश्यक आहेत. ते 28 दिवस म्हणजे साधारण महिन्याभराच्या अंतरानं दिले जातात. पहिला डोस शरीराला विषाणू विरुद्ध लढण्यासाठी तयार करतो, तर दुसरा डोस त्याला आणखी मजबूत करतो. त्यामुळे पहिला डोस दिल्यानंतरही मास्क लावणं आणि सुरक्षित शारीरिक अंतर राखणं महत्त्वाचं आहे. दोन डोस घेतल्यानंतर याचा अधिक प्रभाव पडतो.
रुग्णालयाच्या हवेत सापडला कोरोनाव्हायरस; 2 तासांपेक्षाही अधिक काळ जिवंत
भारतातली पहिली स्वदेशी कोव्हिड लस कशी तयार झाली ?
भारतात कोरोना विषाणूचे सॅम्पल बनवून ही लस निर्माण करण्यात आली आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (Natioanl Instiute of Virology) हा विषाणू आयसोलेट करण्यात आला. त्यानंतर त्याचा उपयोग लस निर्मितीसाठी करण्यात आला. वैज्ञानिकांनी आधी याचा स्टॉक तयार केला आणि त्यानंतर बीटा प्रोपियोलॅक्टोन नावाच्या रसायनात ते मिसळले. त्यामुळे विषाणूचे जीन्स प्रभावित होऊ लागतात, तो आपली संख्या वाढवू शकत नाही आणि त्याचा प्रभाव हळूहळू नष्ट होतो.
या सर्व लशी सुरक्षित आहेत का?
हो, वैज्ञानिकांचा दावा आहे की, या सर्व लशी सुरक्षित आहेत. जगभरात जिथं जिथं लसीकरण सुरू झालं आहे, तिथून काही दुष्परिणामांच्या बातम्या आल्या आहेत, पण डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या मते याचे कारण लस नाही. आपलं शरीर वेगवेगळ्या औषधांवर वेगेवगळ्या पद्धतीनं प्रतिसाद देतं. काही लोकांना काही औषधं, काही मिश्रण याची अॅलर्जी असते. मात्र अनेक चाचण्या आणि त्यातून आलेल्या निष्कर्षांच्या आधारावर कोरोनावरील लस सुरक्षित असल्याची ग्वाही देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine