Home /News /coronavirus-latest-news /

Corona च्या दुसऱ्या लाटेत अधिक प्रतिकारशक्तीच ठरतीये तरुणांसाठी घातक, डॉक्टरांनी सांगितलं कारण

Corona च्या दुसऱ्या लाटेत अधिक प्रतिकारशक्तीच ठरतीये तरुणांसाठी घातक, डॉक्टरांनी सांगितलं कारण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (2nd Wave of Corona) अनेक तरुणांचे जीव घेतले. तरुणांची कणखर प्रतिकारशक्तीच (Strong Immunity) त्याच्यासाठी घातक ठरली, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

नवी दिल्ली 22 मे : कोरोनाची पहिली लाट (Corona First Wave) ज्येष्ठ नागरिकांसाठी घातक ठरली. वयाने मोठ्या असलेल्या अनेक नागरिकांचा त्यात बळी गेला. दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) मात्र हे चित्र उलट दिसलं. अनेक तरुणांचे जीव कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने घेतले. विषाणूशी प्रतिकार करण्याची क्षमता ज्येष्ठांच्या तुलनेत तरुणांमध्ये अधिक असते. मग तरीही तरुणांमध्ये या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर कसा झाला, असा प्रश्न मनात येतो. कोणतीही सहव्याधी नसलेल्या अनेक तरुणांचा या संसर्गाने बळी घेतला. हे कसं झालं, असा सवालही उठतो. आता या प्रश्नांचं उत्तर मिळालं आहे. तरुणांची कणखर प्रतिकारशक्तीच (Strong Immunity) त्यांच्यासाठी घातक ठरली, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. हे आश्चर्यकारक असलं, तरी खरं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये या संदर्भातलं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. सायटोकाइन स्टॉर्म (Cytokine Storm) नावाच्या शरीरात होणाऱ्या जैविक प्रक्रियेमुळे तरुणांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विषाणूला मारण्यासाठी शरीर स्वतःच्याच पेशी (Cells) आणि ऊतींवर (Tissues) हल्ला सुरू करतं. वयस्कर व्यक्तींच्या बाबतीतही हे घडत आहे; पण त्यांची प्रतिकारशक्ती (Immunity) कमी असल्याने त्यांच्यावर या प्रक्रियेचा परिणाम प्राणघातक ठरत नाही. सीएमआरआय हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. राजा धर सांगतात, 'यंदा कोरोनाच्या लाटेत सापडलेले बहुतांश तरुण हेल्दी आहेत. त्यापैकी थोड्याच जणांना काही इतरही आजार आहेत. गेल्या वर्षीच्या लाटेत या तरुणांच्या आजाराचं रूप सौम्य होतं. यंदा मात्र त्यांना कोरोनापुढे शरणागती पत्करावी लागली. सायटोकाइन स्टॉर्म हे त्याचं कारण आहे. त्याचा सर्वांत जास्त परिणाम फुप्फुसांवर होतो. त्यानंतर हृदय, किडनी आणि लिव्हर यांच्यावर टप्प्याटप्प्याने परिणाम होत जातो. त्यामुळेच तरुणांना प्राथमिक अवस्थेतच श्वास घ्यायला त्रास होत आहे.' सायटोकाइन स्टॉर्मचा अर्थ असा, की जेव्हा एखाद्या बाह्य जिवाणू किंवा विषाणूचा हल्ला शरीरावर होतो, तेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती त्याचा प्रतिकार करते. सायटोकाइन्स ही एक प्रकारची प्रथिनं म्हणजेच ग्लायकोप्रोटिन्स असतात. शरीराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींकडून त्यांची निर्मिती होते. ही प्रथिनं प्रतिकारशक्तीसह शरीराच्या विविध कार्यांत मदत करतात. शरीराकडून मोठ्या प्रमाणात सायटोकाइन्सची निर्मिती झाली, तर त्याला सायटोकाइन स्टॉर्म (म्हणजे सायटोकाइनचं वादळ) असं म्हणतात. सायटोकाइन स्टॉर्मची परिस्थिती निर्माण झाली, तर ही सायटोकाइन्स विषाणूशी लढण्याऐवजी शरीरातल्या पेशी आणि ऊतींशीच लढा देतात. आधीच संसर्गामुळे कमजोर झालेल्या शरीरासाठी ते प्राणघातक ठरतं. काही कॅन्सरच्या उपचारांदरम्यानही सायटोकाइन स्टॉर्मची निर्मिती होत असल्याचे पुरावे आहेत. कोविडमुळे उत्तेजन मिळणाऱ्या सायटोकाइन स्टॉर्मची तीव्रता जास्त असल्याचं अभ्यासात आढळलं आहे. कोविड-19ने (Covid19) ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या रक्तात सायटोकाइन्सचं प्रमाण जास्त असल्याचं आढळलं आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरण (Vaccination) मोहिमेला काही महिन्यांपूर्वीच सुरुवात झाल्यानं आता तरुणांना संसर्गाचा धोका अधिक आहे. आपल्याला काही होणार नाही, असा गैरसमज तरुणांमध्ये आहे; पण यावेळी कोणताही आजार नसलेल्यांनाही कोरोना सोडत नाहीये. तरुणांमध्ये संसर्गाचं प्रमाण जास्त आहे, असं बेल व्ह्यू क्लिनिक इंटर्नल मेडिसिन कन्सल्टंट म्हणतात. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार दुसऱ्या लाटेतले 32 टक्के रुग्ण 30 वर्षांखालचे आहेत. पहिल्या लाटेत हे प्रमाण 31 टक्के होतं. दुसऱ्या लाटेत युवकांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज लागण्याचं प्रमाणही जास्त होतं. दोन्ही लाटांमध्ये 30 ते 40 या वयोगटातल्या रुग्णांचं प्रमाण 21 टक्के होतं. अनेक तरुणांच्या फुप्फुसांमध्ये ग्राउंड ग्लास ओपेसिटी आढळून आली. त्याचा अर्थ संसर्गामुळे फुप्फुसांचं आकार किंवा रूप बदलणं. या विषाणूचे अनेक व्हॅरिएंट्स असल्याने संपूर्ण कुटुंबंच संसर्गग्रस्त होत आहेत, असं 'नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल'चं म्हणणं आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Corona spread, Coronavirus, Health Tips, Immun

पुढील बातम्या