नवी दिल्ली, 24 एप्रिल : कोरोना संसर्गाचा वेग आणि आजाराची तीव्रता वाढत चालली असल्यामुळे ऑक्सिजन द्यावा लागणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा (Medical Oxygen) जाणवत आहे. त्यातच काही ठिकाणी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे (Oxygen Shortage) काही दुर्घटना घडत असल्यामुळे त्यातही काही जणांचे बळी गेले आहेत.
बीड
नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्ये (Beed) आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमधला, ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधला व्हॉल्व्ह अज्ञात व्यक्तीने बंद केल्यामुळे दोघा कोरोनाबाधितांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. हे बाधित 35 आणि 55 वर्षांचे होते. रुग्णांच्या नातेवाईकांनी असा दावा केला असून शुक्रवारी रात्री (23 एप्रिल) हॉस्पिटलच्या वॉर्ड क्रमांक सातमध्ये हा प्रकार घडला.
दरम्यान, दोन मृतांपैकी एकच रुग्ण ऑक्सिजनवर होता, असं हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं आहे; मात्र मृतांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार दोघांचाही मृत्यू ऑक्सिजनअभावी झाला आहे. 'ऑक्सिजन सप्लाय व्हॉल्व्ह बंद केलेला असल्याचं हॉस्पिटल टीमला दिसलं. कोणी तरी तो बंद केला असावा,' असं बीडचे अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. सुखदेव राठोड यांनी सांगितलं. एक रुग्ण ऑक्सिजनवर होता, तर दुसऱ्याचीही परिस्थिती गंभीर होती, असं डॉ. राठोड म्हणाले. एकाचा HRCT स्कोअर 19, तर दुसऱ्याचा 23 होता, असं त्यांनी सांगितलं.
'ऑक्सिजनअभावी तरुण रुग्ण पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखा तडफडत मेला. ती परिस्थिती अत्यंत भयानक होती. त्या वेळी वॉर्ड बॉयही उपस्थित नव्हता,' असा दावा एका नातेवाईकाने केला. दरम्यान, या प्रकरणी चौकशी केली जाईल, असं हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितलं.
हे ही वाचा-आवश्यकता नसताना शेकडो लोक रुग्णालयात भरती; प्रशासनाकडून कारवाईचे आदेश
अमृतसर
अशीच एक दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री अमृतसरमध्ये (Amritsar) घडली. त्यात दोन महिलांसह सहा जणांचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाला. त्यापैकी पाच जण कोरोनाबाधित होते. नील कांत या खासगी हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला दोन दिवसांपूर्वीच सांगण्यात आलं होतं, तसंच रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलला हलवण्याचं त्यांच्या नातेवाईकांनाही सांगण्यात आलं होतं, असा दावा हॉस्पिटलकडून करण्यात आला.
दरम्यान, पंजाबचे वरिष्ठ कॅबिनेट मंत्री ओ. पी. सोनी यांनी मात्र या प्रकरणात हॉस्पिटलचा हलगर्जीपणा दिसत असल्याचं म्हटलं आहे. हॉस्पिटलकडून ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात काहीही कळवण्यात आलेलं नसल्याचं निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचं सोनी म्हणाले. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत होता. गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित असल्याने जिल्हा प्रशासनाने तिकडे जास्त पुरवठा केला होता. आता तो सुरळीत करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी खासगी हॉस्पिटल्सना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा सरकारकडून केला जात नसल्याबद्दल रोष व्यक्त केला.
हे ही वाचा-कोरोना संकटात रुग्णांच्या नातेवाईकांची लूट, ICU बेडसाठी डॉक्टरने दीड लाख घेतले
ग्वाल्हेर
मध्य प्रदेशातही (MP) ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासतो आहे. जबलपूरमधल्या (Jabalpur) एका खासगी हॉस्पिटलमधल्या पाच जणांना शुक्रवारी ऑक्सिजनअभावी प्राण गमवावे लागले. त्याच दिवशी ग्वाल्हेरमधल्या (Gwalior) सरकारी जनआरोग्य हॉस्पिटलमध्ये आणखी दोघांचा त्याच कारणामुळे मृत्यू झाला. हे रुग्ण अनुक्रमे 65 आणि 75 वर्षांचे होते. रुग्णांच्या नातेवाईकांनी आयसीयू वॉर्डमध्ये आंदोलन सुरू केल्यामुळे काही काळ वातावरण तंग झालं होतं. ऊर्जामंत्री प्रद्युम्नसिंह तोमर यांनी घटनास्थळी जाऊन ऑक्सिजन सिलिंडर्सची व्यवस्था करण्यात रात्र घालवली. महाराजपूर प्लांटमधून सिलिंडर्स तिथे येईपर्यंत पहाटे तीनपर्यंत ते तिथे होते. जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक प्रशासकीय अधिकारीही ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात गुंतले होते. जनआरोग्य हॉस्पिटलमधल्या 60 रुग्णांना पथ्थरवाली बिल्डिंगमध्ये हलवण्यात आलं. ग्वाल्हेरमधल्या 2055 कोविड पेशंटपैकी 1009 पेशंट ऑक्सिजनवर आहेत.
जिल्हा रुग्णालय आणि पाच खासगी हॉस्पिटल्सचा ऑक्सिजन पुरवठा एकाच वेळी खंडित झाला होता. आता चार नव्या ऑक्सिजन प्लांट्सवर काम सुरू असून, 37 जिल्ह्यांत अशा नव्या प्लांट्ससाठी काम सुरू आहे. काही हॉस्पिटल्स ऑक्सिजन तुटवड्यामुळे रुग्णांना नकार देत असल्याचंही वृत्त आहे. दरम्यान, भोपाळ रेल्वे स्टेशनवर रेल्वेकडून वैद्यकीय सुविधांसह 20 आयसोलेशन कोचेस उपलब्ध करण्यात आले आहेत. तेथे 320 बेड्सची सोय असून, 25 एप्रिलपासून ही सुविधा सुरू होणार असल्याचं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.