कोरोना विषाणूच्या जगभर पसरलेल्या संसर्गाने लाखो माणसांचे प्राण घेतले. आर्थिक फटक्यामुळे जगभरातली कोट्यवधी कुटुंबं रस्त्यावर आली. कोरोना संसर्ग होऊन बरे झाले त्यांना नंतरही जाणवत असलेल्या शारीरिक समस्या हे एक वेगळं आव्हान आहेच. एकंदरीतच यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या मानवजातीला दीर्घकाळ भेडसावणार आहेत. यातच आता या महामारीमुळे झालेल्या आणखी एका दुष्परिणामाबद्दलची माहिती अभ्यासातून पुढे आली आहे. कोरोनाच्या वैश्विक साथीच्या (Corona Pandemic) काळात जन्मलेल्या बालकांची आकलनशक्ती त्याआधीच्या काळात जन्मलेल्या बालकांच्या तुलनेत कमी असल्याचं अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासातून दिसून आलं आहे. ब्राउन विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर ऑफ पेडिअॅट्रिक्स (रिसर्च) म्हणून कार्यरत असलेल्या सीन देवनी (Sean Deoni) यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला होता. 'गार्डियन'ने याबद्दलचं सविस्तर वृत्त दिलं आहे.
या अभ्यासात ऱ्होड आयलंडमधल्या (Rhode Island) 672 मुलांचा समावेश होता. यापैकी 176 मुलं जानेवारी 2019 ते मार्च 2020 या कालावधीत जन्मलेली होती. 308 मुलं जानेवारी 2019पूर्वी, तर 188 मुलं जुलै 2020नंतर जन्मलेली होती. या अभ्यासासाठी निवडण्यात आलेली मुलं प्रसूतीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच म्हणजे पूर्ण वाढ झाल्यानंतरच जन्माला आली होती. तसंच, त्यांना कोणत्याही प्रकारचं व्यंग नव्हतं आणि बहुतांश मुलं श्वेतवर्णीय होती.
हे ही वाचा-धक्कादायक! Delta Plus चा मुंबईत पहिला बळी; कोरोना लस घेतल्यानंतरही मृत्यू
तीन महिने ते तीन वर्षं या वयोगटातल्या मुलांचा सरासरी बुद्ध्यांक (Mean IQ) काढण्यासाठी काही चाचण्या निश्चित करण्यात आलेल्या असतात. कोरोना वैश्विक साथीच्या आधीच्या दशकात हा सरासरी बुद्ध्यांक सुमारे 100पर्यंत असायचा. कोरोना वैश्विक साथीच्या काळात जन्मलेल्या मुलांवर घेण्यात आलेल्या वर उल्लेखलेल्या चाचण्यांमध्ये मात्र हा सरासरी बुद्ध्यांक 78 असल्याचं दिसून आलं. हा खूप मोठा फरक आहे. या अभ्यासाचा पीअर-रिव्ह्यू अद्याप झालेला नाही. तरीही याचे निष्कर्ष धक्कादायक आहेत.
कोणत्याही बालकाच्या आयुष्यातली पहिली काही वर्षं ही त्याच्या आकलनशक्तीच्या विकासाच्या (Cognitive Development) दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात; मात्र कोविड-19मुळे (Covid-19) अनेक व्यवहार बंद पडले. शाळा, खेळाची मैदानं, नर्सरी उघडू शकल्या नाहीत. त्यामुळे लहान मुलांच्या आयुष्यात मोठा फरक पडला. घरातल्या घरात खेळण्यावर किंवा जीवनातले वेगवेगळे अनुभव घेण्यावर येणाऱ्या मर्यादा, बाहेरच्या जगाशी कमी झालेला संपर्क यांमुळे मुलांच्या आकलनशक्तीवर मोठा परिणाम झाला, असं या बुद्ध्यांकाच्या आकड्यावरून दिसत असल्याचं सीन देवनी यांनी सांगितलं. दुसरीकडे, पालकांच्या आयुष्यातही मोठ्या उलथापालथी झाल्या. नोकरी-धंदे बंद पडल्यामुळे ते तणावाखाली होते. पैसे मिळवण्यासाठी धडपडत होते. या सगळ्यात आपलं काम आणि बालसंगोपन या दोन्ही गोष्टी सांभाळण्याची तारेवरची कसरत त्यांना करावी लागत होती. त्यामुळे बालकांशी होत असलेला पालकांचा संवादही कमी झाला आणि त्याचाही परिणाम मुलांची आकलनशक्ती विकसित होण्यावर झाल्याचं देवनी म्हणाले.
या चाचण्या अमेरिकेतल्या तशा तुलनेने सधन असलेल्या प्रदेशात घेण्यात आल्या आहेत. त्या प्रदेशात बेरोजगारी भत्ता मिळतो, तसंच अन्य सोयीही आहेत; मात्र देशातल्या, तसंच जगातल्या गरीब प्रदेशांमधली स्थिती याहून बिकट असेल, अशी भीतीही देवनी यांनी व्यक्त केली.
लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधले सर टेरेन्स स्टीफन्सन यांनी सांगितलं, की शाळकरी मुलांवर कोरोना आणि लॉकडाउनच्या झालेल्या परिणामांबद्दल आतापर्यंत बरंच लिहिलं गेलं आहे; मात्र नवजात बालकं, तसंच तीन वर्षांपर्यंतच्या मुलांवर काय दुष्परिणाम होत आहेत, याबद्दल फारसं लिहिलं गेलेलं नाही. त्यामुळे हा अभ्यास महत्त्वाचा आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांमध्ये या समस्यांची तीव्रता अधिक असेल, यात शंकाच नाही, असंही ते म्हणाले.
एखादी इमारत बांधायची असेल, तर पाया उभारण्यापूर्वीच तिची रचना ठरवून घेणं अत्यावश्यक असतं. त्याचप्रमाणे माणसाच्या जन्मापासूनच्या पहिल्या काही वर्षांत आकलनशक्तीचा पाया रचला जात असतो. त्यामुळे त्या वयात ज्या गोष्टींचं आकलन होणं गरजेचं असतं, ते तेव्हा होऊ शकलं नाही, तर नंतरच्या आयुष्यात ते करणं अवघड असतं, असं प्रा. सीन देवनी यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Birth rate, Corona, Corona patient