नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second wave of corona virus) फटका सोसणाऱ्या भारतात जर नवा व्हेरियंट (New variant) आला नाही, तर तिसऱ्या लाटेचा धोका (Risk of third wave) कमी असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. दुसऱ्या लाटेनं देशात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती आणि रोज मृत्यूचे नवे आकडे आकडे समोर येत होते. अजूनही दुसरी लाट पूर्णतः ओसरलेली नसून केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरुच असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेबाबत एक दिलासादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. डेल्टाची भीती जगभरात सध्या डेल्टा व्हायरस धुमाकूळ घालत असून आतापर्यंतचा हा सर्वात भयंकर व्हायरस असल्याचं सिद्ध झालं आहे. मात्र भारतात येऊन गेलेली कोरोनाची दुसरी लाट हीच डेल्टा व्हायरसमुळेच आली होती. त्यामुळे भारतातील अनेकांना डेल्टाची लागण होऊन गेली असून हर्ड इम्युनिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचं मत साथरोग तज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे भारतीयांना आता डेल्टा व्हायरसची फारशी भीती नसून जर कुठलाही नवा व्हेरियंट आला नाही, तर तिसऱ्या लाटेची फारशी भीती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अशी असेल तिसरी लाट भारतात जरी कोरोनाची तिसरी लाट आली, तरी त्याचं स्वरूप दुसऱ्या लाटेएवढं भयंकर नसेल, असं डॉ. कांग यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या लाटेच्या वेळी डेल्टा व्हेरियंट हा नवा होता. त्यामुळे अनेकांना त्याची लागण झाली. आता मात्र भारतीयांच्या शरीरात या व्हायरसविरोधात अँटिबॉडिज तयार झाल्या आहेत. अनेक नागरिकांचं लसीकरणदेखील झालं आहे. त्यामुळे डेल्टा व्हेरियंटचा दुसऱ्या लाटेएवढा गंभीर परिणाम निश्चितच होणार नसल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. हे वाचा - कोरोना लस, चाचणी बंधनकारक? गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी काय आहेत नियम? लहान मुलांचं लसीकरण डेल्टा व्हेरियंटचा लहान मुलांना धोका असल्याचं सांगितलं जातं. भारतात लवकरच लहान मुलांचं लसीकरण सुरू होणार असल्याचं चित्र असून वेगवेगळ्या चार कंपन्यांच्या लसींना मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.