सेवानिवृत्त जीवन कसं जगायचं, याबद्दल प्रत्येकाच्या काही कल्पना असतात; पण बहुतांश जणांच्या कल्पनेत विश्रांती किंवा स्वतःच्या राहिलेल्या इच्छा, छंद पूर्ण करणं यांना प्राधान्य असतं. अर्थातच याला अपवादही असतात. अशा अपवादात्मक व्यक्तींना सेवानिवृत्तीनंतरही काम करण्यातच रस वाटतो. किंबहुना समाजाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य असून, सेवानिवृत्तीनंतरही ते निरंतरपणे केलं पाहिजे असं त्यांना वाटतं. अशा व्यक्ती आपल्या कृतीतूनही ते दाखवून देतात. कर्नाटकातल्या (Karnataka) 66 वर्षांच्या एका सेवानिवृत्त नर्सचं उदाहरण त्यापैकीच एक. कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) दुसऱ्या लाटेत (Second Wave) ही नर्स स्वतःला संसर्गाचा धोका असूनही लोकांची विनामूल्य सेवा करण्यासाठी पुढे आली. ‘दी न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या हवाल्याने नवभारत टाइम्सने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाने गंभीर स्वरूप धारण केलं होतं. चामराजनगर (Chamrajnagar) जिल्ह्याच्या कोल्लेगाल आणि हानुरक तालुक्यात अनेक रुग्ण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे (Oxygen) मरत होते. गीता नावाच्या 66 वर्षांच्या नर्सने हे पाहिलं. सेवा हाच स्थायीभाव असलेल्या पेशातून त्या निवृत्त झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना ही परिस्थिती पाहून राहवलं नाही. आपण लोकांना पैशांची मदत तर करू शकत नाही; पण आरोग्य सेवा तर नक्कीच पुरवू शकतो, असा विचार त्यांनी केला. त्या विचारानंतरच त्या लोकांच्या मदतीसाठी पुढे आल्या. त्यांना स्वतःला संसर्गाचा धोका होता. घरात त्यांची 96 वर्षांची आईही असते. तरीही योग्य ती प्रतिबंधात्मक काळजी घेऊन त्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत लोकांच्या मदतीसाठी उतरल्या. हे ही वाचा- फक्त एका फुफ्फुसासह कोरोनाशी लढली; 12 वर्षांच्या दिव्यांग मुलीची व्हायरसवर मात ‘माझ्या ओळखीतल्या दोन व्यक्तींचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. मी लोकांना या कठीण प्रसंगात कशी मदत करू शकेन याचा विचार मी करू लागले. माझ्या भावाने मला सांगितलं, की स्वामी विवेकानंद यूथ मूव्हमेंटद्वारे (SVYM) लोकांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (Oxygen Concentrator) दिले जात आहेत. त्यामुळे मी त्या चळवळीत सहभागी झाले,’ असं त्यांनी सांगितलं. गीता यांनी आपल्या घरात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक तयार केली. कुठूनही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी मागणी आली, की त्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न त्या करतात. अगदी 100 किलोमीटरपर्यंतच्या परिसरातही त्यांनी सेवा दिली. ऑटो-रिक्षातून कॉन्सन्ट्रेटर घेऊन त्या सगळीकडे गेल्या. वेळेवर ऑक्सिजन मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचू शकले. लोकांचं समुपदेशन करण्याचं, त्यांना कोरोनाबद्दल माहिती देण्याचं, जागरूकता निर्माण करण्याचं कामही त्या करतात. ‘गीता यांच्यासारख्या कोरोना योद्ध्यांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे,’ असं स्वामी विवेकानंद यूथ मूव्हमेंटचे मुख्य सचिव एस. परवीन कुमार म्हणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.