नवी दिल्ली 24 मार्च : कोरोना (Corona Virus) महामारीची दुसरी लाट आली असल्याने दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात होळी (Celebration of Holi), गुढीपाडवा, रामनवमी, चैत्र नवरात्र आणि शब-ए-बारात यासारखे सण येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरात हे सण सार्वजनिकपणे साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंबंधीचा आदेश पत्रकाद्वारे दिला आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील सरकारांनी या सणासुदीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आधीपासूनच कराव्यात असंही या आदेशात म्हटलं आहे. सध्या लॉकडाऊन लागू केलं नसलं तरीही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व बंधनं पाळणं गरजेचं आहे. त्यामुळे दोन राज्यांतील तसंच राज्याच्या दोन जिल्ह्यांतील वाहतुकीवर काही बंधनं घातली आहेत.
जिथे संसर्ग वाढण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाला वाटेल तिथे प्रशासन स्थानिक पातळीवर लॉकडाऊन जाहीर करू शकते, असंही केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्याला अनुसरून महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढलेल्या ठिकाणी आणि मुंबईत सार्वजनिक तसंच खासगी पद्धतीने होळी, धुळवड, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे. इतर अनेक राज्यांनीही जिथे आवश्यकता आहे तिथे होळी, नवरात्र सार्वजनिकपणे साजरं करण्यास बंदी केली असून इतर ठिकाणी नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. याबाबतचं वृत्त हिंदुस्थान टाइम्सने वेबसाइटवर प्रसिद्ध केलं आहे.
कोणकोणत्या राज्यांनी काय आदेश दिले आहेत ते जाणून घेऊया -
दिल्ली (Delhi)
दिल्ली आपत्ती व्यवस्थापन अथॉरिटीने (The Delhi Disaster Management Authority) मंगळवारी आदेश दिले की होळी, शब-ए-बारात, नवरात्री यापैकी कोणत्याही सणानिमित्त दिल्ली शहरात सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई (Mumbai)
मुंबई शहरात होळी आणि रंगपंचमीनिमित्त कोणतेही सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रम आयोजित करू नयेत असं महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) मंगळवारी जाहीर केलं.
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)
उत्तर प्रदेश सरकारने सण साजरे करण्यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही पण धार्मिक, सांस्कृतिक मिरवणूक काढण्यासाठी सरकारची आधी परवानगी घेणं बंधनकारक आहे, असं स्पष्ट केलं आहे. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि 10 वर्षांहून लहान मुलांना अशा कोणत्याही समारंभांत सहभागी होण्यास बंदी करण्यात आली आहे.
चंडीगड (Chandigarh)
होळीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी क्लब किंवा हॉटेलमध्येही कार्यक्रम आयोजित करण्यास चंडीगड प्रशासनाने बंदी घातली आहे.
बिहार (Bihar)
बिहारमध्ये सरकारने अधिकृतपणे सण साजरा करण्यावर कोणतीही बंदी घातलेली नाही पण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी जनतेला आवाहन केलं होतं की होळीनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी करून सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत.
गुजरात (Gujarat)
होळी साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही पण मर्यादित लोकांनी एकत्र येऊन होलिका दहन केल्यास त्यांना परवानगी असेल असं गुजरात सरकारने स्पष्ट केलं आहे.
ओडिशा (Odishauttar
ओडिशामध्ये होळीनिमित्त कोणताही धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी असेल. लोक त्यांच्या घरांत होळी साजरी करू शकतात आणि मंदिरांनीही कोविड-19 प्रोटोकॉल पाळून त्यांचे विधी पूर्ण करावेत असं ओडिशा सरकारने जाहीर केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Chandigarh, Corona, Covid-19, Gujarat cm, March 2021, Odisha, Uttar pradesh