Home /News /coronavirus-latest-news /

Omicron Variant : आतापर्यंत ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही, अशांसाठी चिंताजनक वृत्त!

Omicron Variant : आतापर्यंत ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही, अशांसाठी चिंताजनक वृत्त!

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा ओमिक्रॉन व्हॅरिएंट (Omicron Variant) हा संपूर्ण जगासाठी धोका बनू पाहत आहे. भारतात दिल्लीसह अन्य काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

    नवी दिल्ली, 25 एप्रिल : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचा (Corona) संसर्ग पसरल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या चीन, अमेरिकेसह अन्य काही देशांमध्ये कोरोनामुळे स्थिती पुन्हा एकदा गंभीर बनली आहे. भारतात तिसऱ्या लाटेनंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने आता सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दुसरीकडे लसीकरणावर भर दिला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा ओमिक्रॉन व्हॅरिएंट (Omicron Variant) हा संपूर्ण जगासाठी धोका बनू पाहत आहे. भारतात दिल्लीसह अन्य काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोविशिल्ड लसीबाबत (Covishild Vaccine) एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी ओमिक्रॉनच्या BA.1 या व्हॅरिएंटवर कोविशिल्ड लशीच्या परिणामकारकतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. `आज तक`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. ज्या व्यक्तींनी कोविशिल्ड लशीचे दोन डोस घेतले आहेत आणि ज्यांना यापूर्वी कधीही संसर्ग झालेला नाही, त्यांची न्यूट्रलायझिंग पॉवर (Neutralizing power) खूपच कमी असल्याचं दिसून आलं आहे. संसर्गातून बऱ्या झालेल्या आणि कोविशिल्ड लशीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अशा व्यक्तींना अधिक धोका असल्याचं दिसून आलं आहे. आयसीएमआर (ICMR) - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने (National Institute of Virology) केलेल्या अभ्यासात लवकरात लवकर बूस्टर डोस (Booster Dose) घेणं आवश्यक असल्याचे संकेत मिळाले आहेत. या अभ्यासासाठी व्यक्तींची तीन गटांत विभागणी करण्यात आली. पहिल्या गटात उत्तर प्रदेशमधल्या 18 अशा व्यक्तींचा समावेश होता, की ज्यांनी कोविशिल्डचा पहिला डोस आणि कोव्हॅक्सिनचा (Covaxin) दुसरा डोस घेतला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या गटात अशा 40 व्यक्तींचा समावेश होता, ज्यांनी दोन्ही डोसेस कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यांपैकी एकाच लशीचे घेतले होते. हे ही वाचा-कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही चौथी लाट तर नाही? तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाला तज्ज्ञांचं उत्तर या अभ्यासात कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसनंतर 180 दिवसांनी 24 कोरोनाबाधित रुग्णांचं सीरम सॅम्पल (Serum Sample) गोळा करण्यात आलं. तसंच अद्याप कोरोना न झालेल्या आणि कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्या 17 व्यक्तींचं सॅम्पलदेखील घेण्यात आलं. या व्यक्तींमध्ये कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचं दिसून आलं. कोविशिल्ड लशीचे दोन्ही डोसेस घेतल्यानंतर SARS-CoV-2 च्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा समावेश तिसऱ्या गटात होता. संसर्ग झाल्यानंतर 14 ते 30 दिवसांनी या गटातल्या व्यक्तींच्या सीरमचे नमुने गोळा केले गेले. यापैकी केवळ 21 प्रकरणांमध्ये संपूर्ण जीनोम पुनर्प्राप्त करण्यात आला. यात कोविशिल्डनंतर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिल्याने डेल्टा किंवा `व्हॅरिएंट ऑफ कन्सर्न`विरुद्ध चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. तथापि, कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटविरुद्ध सर्व गटांमध्ये न्यूट्रलायझिंग अ‍ॅंटिबॉडी लेव्हल (Neutralizing Antibody Level) घटल्याचं दिसून आलं. सर्व नमुन्यांनी ओमिक्रॉनपेक्षा B.1, बीटा आणि डेल्टा (Delta) व्हॅरिएंटचा प्रभावीपणे मुकाबला करून त्याला विरोध केल्याचं दिसून आलं. तथापि, सीरम सॅम्पलमध्ये ओमिक्रॉन विरुद्ध अ‍ॅंटिबॉडीजचं प्रमाण सर्वांत कमी म्हणजेच 0.11 सरासरी असल्याचं आढळलं. त्या तुलनेत अन्य प्रकरणांमध्ये त्याची सरासरी 11.28 आणि 26.25 होती. याबाबत एका शास्त्रज्ञानं सांगितलं, `सर्वाधिक म्युटेट (Mutate) झालेला ओमिक्रॉन हा डेल्टा किंवा अन्य व्हॅरिएंटपेक्षा लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्तीला कोणत्याही प्रकारे चकवा देऊ शकतो.` यापूर्वी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने एका अभ्यासानंतर ओमिक्रॉन व्हॅरिएंटबाबत सांगितलं होतं, की कोविड लशीचे दोन डोस घेतल्यानंतर तयार झालेली अ‍ॅंटिबॉडीची पातळी सहा महिन्यांनंतर कमी होऊ लागते.
    First published:

    Tags: Corona spread, Corona vaccine, Omicron

    पुढील बातम्या