नवी दिल्ली 28 मार्च : शनिवारी केंद्र सरकारने 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची कोरोनासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. त्याअंतर्गत या राज्यांमधील कोरोना तपासणीची संख्या वेगाने वाढविण्यासाठी आणि कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन (Restrictions to Curb Spread of Corona) होण्यासाठी कडक कारवाई करण्यास सांगितले गेले आहे. ज्या राज्यांमध्ये कोरोना (Coronavirus) संसर्गाचे प्रमाण वाढले आहे अशा राज्यांसाठी हा सल्ला जारी केला आहे. मंत्रालयानं म्हटलं आहे, की संक्रमित व्यक्ती कोणत्याही निर्बंधाशिवाय 30 दिवसात सरासरी 406 लोकांना बाधित करू शकतो. सरकारने म्हटले आहे, की मे 2020 नंतर कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या साप्ताहिक घटनांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. सरकारने म्हटले आहे, की अशा 46 जिल्ह्यांकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे ज्यात या महिन्यात संक्रमणाच्या एकूण प्रकरणांपैकी 71% आणि या प्रकरणांमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 69% टक्के नोंदविण्यात आली आहेत. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक आहे. देशात मागील एका आठवड्यात आढळून आलेल्या प्रकरणांपैकी 59.8 टक्के रुग्ण याच जिल्ह्यांमधील आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली १२ राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव (आरोग्य व कुटुंब कल्याण) तसंच सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि मृत्यू नोंदवल्या गेलेल्या ४६ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांची उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तमिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू कश्मीर, कर्नाटक, पंजाब आणि बिहार या राज्यांसाठी आणि केंद्र शासित प्रदेशांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रभावित जिल्ह्यांतील स्थितीचा आढावा घेण्यात आला. यानुसार जवळपास 90% मृत्यू हे 45 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्यांचे झाले आहेत. यात असंही समोर आलं आहे, की 90% लोकांना संसर्गाबद्दलची माहिती असतानाही मास्क केवळ 44% लोकच वापरतात. मंत्रालयानं म्हटलं, की एक कोरोना रुग्ण 30 दिवसात 406 लोकांना बाधित करू शकतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं कारण लोकांमधीस संपलेली भीती आणि हलगर्जीपणा असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.