वॉशिंग्टन, 5 जानेवारी : 2020 या वर्षाला निरोप देऊन 2021मध्ये प्रवेश करताना मानवाच्या हाती कोरोनाप्रतिबंधक लशीचं शस्त्र आलं आहे. तरीही जग कोरोनामुक्त व्हायला अद्याप बराच कालावधी आहे. त्यामुळे कोरोना विषाणूला नष्ट करून कोविडमुक्त जगात (Covidfree World) जगणं, हे प्रत्येकाचंच स्वप्न आहे. अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातल्या जोश टर्नयाक (Josh Ternyak) नावाच्या 16 वर्षांच्या मुलाने हे स्वप्न ‘कोविड एन्वेडर्स’ (Covid Invaders) या नावाचा व्हिडीओ गेम (Video Game) तयार करून पूर्ण केलं. या गेममध्ये तुम्ही केवळ एका क्लिकमध्ये कोरोना विषाणूला मारू शकता. व्हिडीओ गेम खेळणाऱ्या व्यक्ती कोरोना प्रतिबंधक लशीची सीरिंज (Syringe) घेऊन कोरोना विषाणूला मारू शकतात. लोकांच्या मनाला आनंद देईल असं काही तरी या काळात देणं, हा गेम तयार करण्यामागचा उद्देश होता, असं जोश यानं ‘सीआयपीप्राउड डॉट कॉम’ला सांगितलं. सत्तरच्या दशकात स्पेस इन्व्हेडर्स (Space Invaders) हा व्हिडीओ गेम लोकप्रिय होता. त्यापासून जोशने प्रेरणा घेतली. रोमन पेसाखोविच नावाच्या जोशच्या मित्राने कोरोना काळात लोकांना मदत करण्यासाठी वेबसाइट तयार केली. त्यामुळे जोशलाही लोकांचा उत्साह वाढेल असं काही तरी करायची इच्छा होती. लोकांचा ताण कमी व्हावा आणि त्यांचं मनोरंजन व्हावं, अशी त्याची इच्छा होती. म्हणून त्याने हा गेम तयार केला. वयाच्या 11व्या वर्षापासून जोश कोडिंग (Coding) शिकतोय. त्यामुळे गेमचं डिझायनिंग (Game Designing) त्याच्यासाठी सोपं होतं; मात्र सर्व प्रकारच्या डिव्हाइसवर तो गेम खेळता येण्याच्या दृष्टीने आवश्यक ती व्यवस्था करणं अवघड होतं. त्यामुळे विविध डिव्हाइसवर तो गेम लाँच करण्यासाठी त्याला दीड महिना लागला. हा गेम तयार करण्यासाठी जोशने आपलं सारं ज्ञान पणाला लावलं. कोविड-19मुळे गेल्या वर्षीपासून त्याचं होम-स्कूलिंग (Home Schooling) सुरू आहे. लोक मिळालेल्या वेळाचा वापर नवं काही शिकण्यासाठी किंवा काही तयार करण्यासाठी करू शकतात, असं त्याला वाटतं. हे ही वाचा- कोणत्या निकषांवर Covaxin ला मंजुरी? समजून घ्या कोरोना लशीला परवानगीची प्रक्रिया न्यूज ट्रिब्युनशी बोलताना जोशने सांगितलं, की कोरोना विषाणू प्रतिबंधक लस (Vaccine) आणि विषाणूशी लढण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यांबद्दलची जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने या गेमद्वारे केला आहे. जोशने या गेमसोबत वाजण्यासाठी एक विशेष गाणंही (Song) तयार केलं आहे. गाण्याचे शब्द कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासंबंधी आणि त्याला नियंत्रित करण्याच्या मार्गांसंदर्भात आहेत. हे गाणं ऐकताना लोक हसून आनंद घेतात आणि त्या गाण्याबद्दल खूप बोललं जात आहे, असं जोश सांगतो. या गेममध्ये एक सीरिंज असून, ती लाल रंगाच्या कोरोना विषाणूच्या दिशेने सोडायची आहे. यातले काही विषाणू मास्क घातलेले आहेत, काही मोठे आहेत, तर काही लहान. या विषाणूला मारायचा प्रयत्न सुरू केला, की गाणं वाजायला सुरुवात होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.