नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : अमेरिका, चीन, जपानमध्ये कोविड संसर्गग्रस्तांचे आकडे वाढत असतानाच भारतही त्याच्या उंबरठ्यावर आहे की काय अशी चिन्हं निर्माण झाली आहेत. या परिस्थितीवरून भारतात पुढच्या काही दिवसात काय चित्र असेल, याबाबत ‘आयआयटी कोरोना मॉडेल’ तयार करणारे प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी भारतातल्या कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी मोठं वक्तव्य केलंय. पुढचे 40-45 दिवस भारतासाठी महत्त्वाचे असतील, असं त्यांनी सांगितलंय. ‘आज तक’ने त्याबाबतचं सविस्तर वृत्त दिलं आहे. चीनपाठोपाठ अमेरिका आणि जपानमध्ये दररोजच्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. ब्रिटन, दक्षिण कोरियामध्येही रुग्ण वाढताहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतातही सरकारने पावलं उचलायला सुरुवात केलीय. जगभरात संसर्ग पसरलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन BF 7 या व्हॅरिएंटचा रुग्ण देशात सापडल्यामुळे प्रशासनासह सामान्य नागरिकही धास्तावलेत. जगभरातला कोरोनाचा उद्रेक पाहता भारतातही चौथी लाट येणार का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, भारतात जानेवारीमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढू शकते. पुढचे 40-45 दिवस देशातल्या संसर्गप्रसाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील. जेव्हा याआधी कोरोनाची लाट आली, त्याच्या 40 दिवसांनंतर भारतात रुग्णसंख्या वाढलेली आढळून आली, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारतात कोविड मॉडेल बनवणारे आयआयटीचे प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनीही पुढचे काही दिवस देशासाठी कठीण असतील, असं म्हटलंय; मात्र भारतात कोरोनाबाबत घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, असंही त्यांनी म्हटलंय. चीनमध्ये रुग्ण का वाढले? चीनमध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत 5 टक्के नागरिकांमध्येही नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती तयार झाली नव्हती. नोव्हेंबरपर्यंत हा आकडा 20 टक्क्यांपेक्षा कमी होता. त्यामुळेच ओमिक्रॉनच्या नव्या व्हॅरिएंटचा प्रसार चीनमध्ये जास्त झाला. अजूनही चीनमध्ये 60 टक्के नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली नाहीये. चीनमध्ये जोवर 90 टक्के नागरिक कोरोनाबाधित होत नाहीत, तोपर्यंत तिथे बाधितांचे आकडे वाढतानाच दिसतील, असं त्यांनी सांगितलंय. म्हणजेच कोविडशी लढण्याकरिता नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित होईल, तेव्हा तो संसर्ग कमी होईल. तिथल्या सरकारच्या झिरो कोविड पॉलिसीमुळे नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती विकसित होऊ शकली नाही. चीनची लोकसंख्या जास्त आहे व त्यापैकी अनेकांमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती विकसित झालेली नाही. त्यामुळे पुढचे काही दिवस चीनसाठी आव्हानात्मक असणार आहेत, असं अग्रवाल यांचं म्हणणं आहे. भारतातल्या कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबतही अग्रवाल यांनी महत्त्वाची माहिती दिली. भारतातल्या 98 टक्क्यांपेक्षा जास्त जणांमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. त्यामुळे भारतीयांनी कोरोनाची काळजी करू नये असं त्यांनी म्हटलंय. कोरोनाबाबत काहीही सांगणं कठीण असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलंय. हळूहळू त्याला स्थानिक संसर्गाचं स्वरूप येईल; मात्र लसीकरण हाच त्यावरचा उपाय असेल, असंही त्या म्हणाल्या. हेही वाचा - BF.7 व्हेरियंटचा भारताला जास्त धोका नाही! तज्ज्ञ काय म्हणताय… मिक्स व्हॅक्सिन येत नाही तोवर लसीचा तिसरा डोस कोरोनापासून संरक्षणासाठी प्रतिकारशक्ती देईल. लसीच्या चौथ्या डोसची आवश्यकता आहे की नाही याबाबत आत्ता सांगता येणार नसल्याचं इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं. सध्या कोरोनाचे दोन प्राथमिक डोस व एक बूस्टर डोस एवढं पुरेसं आहे, असंही त्या म्हणाल्या. याआधी आशिया खंडाच्या पूर्व भागात कोरोनाच्या बाधितांचा आकडा वाढल्यावर साधारण 30-35 दिवसांनी भारतात संसर्ग वाढू लागला होता. त्यामुळे भारतात कोरोनाची चौथी लाट येणार की नाही, त्याबाबत येत्या एक ते दीड महिन्यात चित्र स्पष्ट होऊ शकेल, असं तज्ज्ञांना वाटत आहे. तोवर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.