नवी दिल्ली, 26 डिसेंबर : कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. यादरम्यान तज्ज्ञांकडून एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचा BF.7 व्हेरियंट भारतीयांसाठी चीन इतका गंभीर ठरणार नाही. सेल्युलर आणि मॉलिक्युलर बायोलॉजीचे संचालक विनय के. नंदीकुरी म्हणाले की, भारतीय नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे. त्यामुळे ओमिक्रॉन आणि त्याचे व्हेरियंट भारतासाठी जास्त धोकादायक ठरणार नाहीत. तरीही नागरिकांनी कोविडबाबत खबरदारी घेऊन वागलं पाहिजे, असा सल्ला नंदीकुरी यांनी दिला आहे. याशिवाय ते असंही म्हणाले की, हा विषाणू रोगप्रतिकारक शक्तीचं कवच कधीही तोडू शकतो. त्यामुळे लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही संसर्ग क्षमता जास्त असलेल्या या व्हेरियंटची लागण होऊ शकते. ओमिक्रॉनच्या आधी आलेल्या व्हेरियंटचाही पुन्हा संसर्ग होऊ शकतो. विनय नंदीकुरी यांनी पीटीआय-भाषाला सांगितलं, “सध्याचा पसरत असलेला संसर्ग हा कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा’ व्हेरियंट संसर्गासारखा गंभीर नाही. कारण आपल्याकडे ‘हर्ड इम्युनिटी’ तयार झाली आहे. खरं तर आपण इतर व्हायरच्या संपर्कात असल्यामुळे आपल्याकडे ‘हर्ड इम्युनिटी’ आहे. भारतात आढळले चार रुग्ण - प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, भारतात कोरोना विषाणूच्या BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण आढळले आहेत. याबाबत नंदीकुरी म्हणाले, “आपण भारतात डेल्टाची लाट पाहिली आहे. ती खूपच तीव्र होती. त्यानंतर आपल्याकडे लसीकरण झालं आणि नंतर ओमिक्रॉनची लाट आली. या काळातही आपल्याकडे प्रतिबंधात्मक लसीकरण सुरूच होतं. चीनच्या तुलनेत आपण वेगळे आहोत. त्यामुळे सध्या चीनमध्ये जे घडत आहे ते भारतात घडू शकणार नाही.” केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी (24 डिसेंबर) सांगितलं की, भारतात कोविड -19 चे एकूण 201 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या तीन हजार 397 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यानं सांगितलं की, चीननं स्वीकारलेली ‘झिरो कोविड पॉलिसी’ हे तेथील संसर्ग वेगानं पसरण्याचं मुख्य कारण आहे. लसीकरणाच्या कमी दरामुळे तिथे संसर्गाची तीव्रताही वाढली आहे. हेही वाचा - बजेटआधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण रुग्णालयात, मोठी माहिती आली समोर नंदीकुरी म्हणाले, “भारतात लसीकरणाचं प्रमाण जास्त आहे. ज्येष्ठ नागरिक आणि अतिसंवेदनशील लोकसंख्येला मोठ्या प्रमाणात बूस्टर डोसही दिले गेले आहेत. असं असलं तरी भारतात कोरोना संसर्गाची कोणतीही लाट येऊ शकत नाही, असा दावा केला जाऊ शकत नाही. पण, संसर्गाची कोणतीही लाट लगेच येईल अशी, शक्यता वाटत नाही.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.