न्यूयॉर्क, 28 सप्टेंबर : Covid-19 हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कसा जातो? या प्रश्नाचं उत्तर उलगडण्यासाठी मेरीलँड विद्यापीठाच्या एका प्रयोगशाळेत कोरोना रुग्णांवर काही प्रयोग केले जात आहेत. एका उपकरणाला शंकूच्या आकाराचा एक भाग बसवला आहे. रुग्णाला या भागाच्या मोठ्या तोंडासमोर आपलं तोंड ठेवून खुर्चीवर बसावं लागतं. अर्धा तास ही टेस्ट चालते. त्यात रुग्णाला शब्द उच्चारायला, गायला किंवा शांतपणे बसायला सांगतात. या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांना कधी कधी खोकला येतो.हे सर्व करताना शंकू त्या व्यक्तीच्या तोंडातून आणि नाकातून येणारी प्रत्येक गोष्ट शोषून घेतो. या उपकरणाला Gesundheit असं म्हटलं जातं. या उपकरणामुळे संक्रमित व्यक्तीच्या तोंडातून, नाकातून, उच्छवासातून बाहेर फवारल्या गेलेल्या सूक्ष्म कणांचं मोठं स्वरूप शास्रज्ञांना या उपकरणात पाहता येतं. लोक ज्या वेळी शिंकताना, खोकताना, गाणं गाताना, ओरडताना किंवा अगदी श्वासोच्छवास करतानाही ते कण बाहेर पडतात. हे सर्व कण शास्रज्ञ मोठ्या स्वरूपात पाहू शकतात आणि त्यावर संशोधन करतात. यातून त्यांना हे शोधायचं आहे की असं कोणतं कारण आहे ज्यामुळे कोरोनाचा विषाणू एकाकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित होतो. तो प्रसार आपण रोखू शकलो तर कोरोनाला रोखता येऊ शकतं असा शास्रज्ञांचा अंदाज आहे. वाचा- नवी समस्या! कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये दिसत आहे ‘या’ आजाराची लक्षणं रुग्णाकडून हवेत प्रसारित होणारे वेगवेगळे शिंतोडे हे वेगवेगळ्या आकारांचा असतात. जे शिंतोडे जास्त वजनाचे आणि आकारानी मोठे आहेत ते जास्त अंतर जाऊ शकत नाहीत. हलके शिंतोडे दूरवर जातात त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये किमान 6 फुटांचं अंतर ठेवायला हवं असं शास्रज्ञांनी निश्चित केलं होतं. मोठे शिंतोडे दूरवर जात नाहीत ते लवकरच जमिनीच्या दिशेनी जातात. त्यामुळे त्यांच्यापासून संसर्गाचा धोका कमी होतो. वाचा- सिनेमागृह, स्विमिंग पूल होणार सुरू? आज जारी होऊ शकतात Unlock 5.0 च्या गाइडलाइन्स 200 पेक्षा अधिक शास्रज्ञांनी जुलैमध्ये एरोसोलच्या संभाव्य जोखमीकडे लक्ष देण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला (WHO) एअरोसोलबाबत विचार करण्याची विनंती केली होती. त्याआधी WHO नी एअरोसोलपासून संसर्गाचा विशेष धोका नाही असं म्हटलं होतं.पण नव्या संशोधनातून एअरोसोलच्या माध्यमातूनही संसर्ग होऊ शकतो असं लक्षात आलं आहे. त्यामुळे WHO ही त्याबाबत विचार करेल असं संशोधकांना वाटतं. वाचा- खूशखबर! कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा कमी अंतरावर असलेल्या लोकांना संसर्ग झाल्याची अनेक उदाहरणं शास्रज्ञांच्या लक्षात आली आहेत. त्यामुळे मास्क वापरणं तो स्वच्छ ठेवणं ही काळजी घेणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर सुरक्षित म्हणजे दोन व्यक्तींमध्ये 6 फुटांचं अंतर ठेवणं, गर्दी करणं टाळणं हे उपायही सुरूच ठेवावे लागणार आहेत. संशोधनाअंतीही कोरोनाच्या विषाणूचा प्रसार कशामुळे होतो आहे हे संशोधकांना खात्रीशीररित्या सांगता येत नाही त्यामुळे ते पुढे संशोधन करत आहेत. लस किंवा औषध येईपर्यंत आपण सावध राहणंच हिताचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.