नवी दिल्ली 01 जून : देशभरात कोरोनासोबतच (Coronavirus) ब्लॅक फंगसचा प्रसारही झपाट्यानं होत आहे. ब्लॅक फंगसनं (Black Fungus) आता देशातील 26 राज्यांमध्ये हातपाय पसरले आहेत. ब्लॅक फंगसचे संपूर्ण देशभरात सध्या 20 हजार रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सगळ्यात मोठी समस्या याच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची कमी ही आहे. या इंजेक्शनचा इतका मोठा तुटवडा आहे, की एकूण मागणीच्या दहा टक्केही इंजेक्शनही सध्या उपलब्ध नाहीत.
दुसरीकडे, केंद्रीय रसायन व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी सोमवारी माहिती दिली की केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एम्फोटेरिसिन-बीचे अतिरिक्त 30,100 डोस पाठवले आहेत. एम्फोटेरिसिन-बीचा उपयोग ब्लॅक फंगसच्या उपचारात केला जातो. हा रोग नाक, डोळे, सायनस आणि कधीकधी मेंदूवर वाईट परिणाम करतो.
गौडा यांनी ट्विटवरुन माहिती दिली, की सर्व राज्य/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना आज एम्फोटेरिसिन-बीचे 30,100 डोस पाठवले गेले आहेत. यात महाराष्ट्राला सर्वाधिक 5,900 आणि गुजरातला 5,630 उपलब्ध करुन दिले आहेत. यापाठोपाठ आंध्र प्रदेश 1,600, मध्य प्रदेश 1,920, तेलंगणा 1,200, उत्तर प्रदेश 1,710, राजस्थान 3,670, कर्नाटक 1,930 आणि हरियाणाला 1,200 दिले गेले आहेत. देशात अजूनही केवळ एक लाखाच्या आसपासचं एम्फोटेरिसिन-बीच्या उत्पादनाची क्षमता आहे. अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, दादरा नगर हवेली, लडाख,लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, मिजोराम, सिक्किम आणि नागालँड वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ब्लॅक फंगसचे रुग्ण रुग्णालयांमध्ये भर्ती आहेत.
बेंगळुरुच्या मणिपाल रुग्णालयातील डॉक्टर रघुरात हेगडे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली, की ब्लॅक फंगसच्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ऑपरेशन करावं लागत आहे. मात्र, तरीही त्यांचा जीव वाचवणं कठीण होत आहे. आतापर्यंत त्यांना अनेक रुग्णांचे डोळे काढावे लागले आहेत. काही रुग्ण सुरुवातीची लक्षणं दिसताच रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र, वेळेवर औषध आणि इंजेक्शन मिळत नसल्यानं त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus