नवी दिल्ली 01 मे: कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण (Vaccination) सुरू होऊन बरेच दिवस झाले असले, तरी अद्याप त्याबद्दलचे प्रश्न पडणं संपलेलं नाही. तसंच, लशींची पुरेशी उपलब्धता नसणं, दोन डोसमधलं अंतर वाढवलं जाणं, आदींमुळे लसीकरणाबद्दलच्या प्रश्नांत आणखीच वाढ होत आहे. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे मिक्स अँड मॅच लसीकरण. म्हणजेच पहिला डोस आणि दुसरा डोस हे दोन्ही वेगवेगळ्या लशींचे घेणं. त्यासाठी अधिकृत परवानगी दिलेली नाही, तरीही अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या लशी घेतल्या तर उपयोग होईल की त्रास होईल, असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.
स्पेन आणि ब्रिटनमध्ये मिक्स अँड मॅच (Mix & Match Vaccination) लसीकरणाच्या चाचण्या सुरू आहेत. त्या चाचण्यांचे प्राथमिक निष्कर्ष दिलासादायक आहेत. एकाच लशीच्या दोन डोसेसच्या तुलनेत दोन वेगवेगळ्या लशींचे डोस घेतले, तर शरीरात जास्त प्रमाणात अँटीबॉडीज (Antibodies) विकसित होऊ शकतात, असे संकेत त्यातून मिळाले आहेत.
थेराप्यूटिक गुड्स अॅडमिनिस्ट्रेशन (TGA) या ऑस्ट्रेलियाच्या औषध नियामक यंत्रणेने अद्याप मिक्स अँड मॅच लसीकरणाला मान्यता दिलेली नाही; मात्र काही देश तशी अंमलबजावणी करत आहेत. हे खरंच वैद्यकीयदृष्ट्या फायदेशीर असलं आणि तशी मंजुरी मिळाली, तर काय होईल, याचा घेतलेला हा आढावा...
मिक्स अँड मॅच लसीकरण सुरू झालं, तर लसीकरण कार्यक्रमात मोठी लवचिकता येईल.त्यामुळे जागतिक पातळीवर असलेल्या लशींच्या तुटवड्याच्या समस्येला तोंड देता येईल. एखाद्या लशीचा तुटवडा असेल, तर संपूर्ण लसीकरण कार्यक्रम थांबवण्यापेक्षा तो कार्यक्रम दुसऱ्या लशीद्वारे सुरू ठेवता येईल. एखादी लस दुसरीपेक्षा कमी प्रभावी असेल, तर दुसऱ्या लशीच्या डोसमुळे त्या लशीचा प्रभाव वाढू शकतो.
अनेक युरोपीय देशांमध्ये तरुणांना पहिला डोस अॅस्ट्राझेनेकाच्या (Astrazeneca) लशीचा, तर दुसरा डोस फायझरसारख्या (Pfizer) कंपनीच्या एमआरएनए तंत्राद्वारे विकसित केलेल्या लशीचा दिला जावा अशी शिफारस केली जात आहे. जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, नॉर्वे आणि डेन्मार्क या देशांमध्ये मिक्स अँड मॅच लसीकरणाची शिफारस केली जात आहे. कारण तेथे काही ठिकाणी अॅस्ट्राझेनेकाच्या लशीमुळे रक्त गोठणं किंवा रक्तस्राव आदींसारखे साइड इफेक्ट्स अल्प प्रमाणात दिसून येत आहेत.
लॅन्सेट या जर्नलमध्ये मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, वेगवेगळे डोस दिलेल्या व्यक्तींना सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणं दुसऱ्या डोसनंतर दिसून आली. त्यात थकवा, ताप, डोकेदुखी, सांधेदुखी आदींचा समावेश होता.
स्पेनमध्येही (Spain) अशाच प्रकारचा एक अभ्यास करण्यात आला होता. त्यातही सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणं दिसून आली. ही लक्षणं दोन्ही सारखेच डोस घेतलेल्या लशींप्रमाणेच होती.
स्पेनमधल्या अभ्यासात असं दिसून आलं, की अॅस्ट्राझेनेकाच्या पहिल्या डोसनंतर फायझरच्या लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी संबंधित व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडीचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर दिसून आला.
या अँटीबॉडीज प्रयोगशाळेत कोरोना विषाणूला निष्प्रभ करू शकल्या. अॅस्ट्राझेनेकाच्या लशीचे दोन्ही डोस घेतल्याच्या तुलनेत दोन वेगवेगळ्या लशी घेतल्यानंतरचा प्रतिसाद उत्तम होता. फायझरच्या लशीनंतर अॅस्ट्राझेनेकाची लस घेतल्यास काय होतं, याचे निष्कर्ष ब्रिटन लवकरच जाहीर करणार आहे.
या सर्वांत महत्त्वाचं आहे ते सर्वांत लवकर लसीकरण करून घेणं. कारण लसीकरणासंदर्भातलं संशोधन सुरू राहील, त्याचे निष्कर्ष येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होत राहील. तोपर्यंत जी उपलब्ध लस असेल, ती घेणं श्रेयस्कर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine