नवी दिल्ली 25 फेब्रुवारी : गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून पसरत असलेली कोरोना महामारी (Corona Pandemic) माघार घेण्यास तयार नसल्याचं चित्र आहे. आतापर्यंत जगाच्या विविध भागांमध्ये कोरोना व्हायरसनं नवीन व्हेरियंटसह (Corona Variant) पुन्हा-पुन्हा आक्रमण केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोरोना विषाणूचे चार प्रमुख व्हेरियंट समोर आले आहेत. अल्फा ( बी.1.1.7, ‘यूके व्हेरियंट’), बीटा ( बी.1.351, ‘दक्षिण आफ्रिका व्हेरियंट’, गामा ( पी.1, ‘ब्राझील व्हेरियंट’) आणि डेल्टा (वंश बी.1.617.2) यांचा त्यामध्ये समावेश आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण झाली असून, लाखो लोकांनी आपला जीवही गमावला आहे. जे लोक कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतून रिकव्हर (Covid Recovered) झाले आहेत त्यांना पोस्ट कोविड समस्यांचा सामना करावा लागला आहे. काहीजण तर कोविडमधून बरे होऊन दीड ते दोन वर्षे झाली आहेत तरीदेखील त्यांना पोस्ट कोविड समस्यांचा (Post Covid Health Issues) त्रास होत आहे. अनेक कोविड रिकव्हर रुग्णांना टिनिटस (Tinnitus), सततचा थकवा, हृदयाची वाढलेली धडधड, न्युरॉलॉजिकल (Neurological) आणि गॅस्ट्रोइंटेस्टीनल समस्यांचा सामना करावा लागत आहे. यापैकी टिनिटसच्या समस्येवर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर भविष्यात त्या व्यक्तीची श्रवणशक्ती कमी होऊ शकते. याशिवाय दीर्घकाळापर्यंत राहणारे न्युरॉलॉजिकल प्रॉब्लेम्सदेखील जीवघेणे ठरू शकतात. द प्रिंटनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. देशात कधी येणार कोरोनाची नवी लाट? कोविड टास्क फोर्सच्या अधिकाऱ्याने दिलं उत्तर कोविडनंतर अनेक रुग्णांना नेफ्रॉलॉजिकल (Nephrological) आणि न्यूरॉलॉजिकल समस्या जाणवत आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये कोविडमधून बऱ्या झालेल्या एका वरिष्ठ सरकारी आरोग्य अधिकाऱ्यानं द प्रिंटला दिलेल्या माहितीनुसार, रिकव्हर झाल्यानंतरही त्यांना थकवा आणि गॅस्ट्रोइंटेस्टीनल (Gastrointestinal) समस्यांसारखी पोस्ट कोविड लक्षणं सतत जाणवत आहेत. त्यांची भूक कमी झाली असून, वजनामध्येदेखील घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (The Union Ministry of Health) देखील कोविडच्या दीर्घकालीन संभाव्य लक्षणांमध्ये नेफ्रॉलॉजिकल आणि न्यूरॉलॉजिकल समस्या सूचीबद्ध केल्या आहेत. मंत्रालयाच्या अंदाजानुसार, अॅक्युट किडनी इंज्युरीच्या (Acute kidney Injury) प्रकरणांतील सुमारे 46 टक्के प्रकरणं कोविडशी संबंधित आहेत. 10 ते 87 टक्के रुग्णांमध्ये न्यूरॉलॉजिकल समस्यांची लक्षणं दिसत आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं विविध रिसर्चचा संदर्भ देत दिली आहे. नेफ्रॉलॉजिकल आणि न्यूरॉलॉजिकल समस्यांव्यतिरिक्त कोविड रिकव्हर रुग्णांना टिनिटसची (Tinnitus) समस्यादेखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अनेकांना कानांमध्ये सतत आवाज येत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक संवेदनाक्षम श्रवणशक्ती कमी झाल्याची तक्रार करणाऱ्या रुग्णांमध्ये पाच ते सहापटींनी वाढ झाली आहे. त्यापैकी बरेच लोक असे आहेत ज्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेमध्ये कोविड झाला होता.
ओमिक्रॉन संसर्गाशी (Omicron Infection) संबंधित दीर्घकालीन गुंतागुंत समजून घेण्यात खूप घाई होत असली तरी रोगाची तीव्रता आणि दीर्घकालीन कोविड समस्यांशी त्यांचा संबंध आहे. ज्यांना कोविडची सौम्य लागण झाली होती असे लोक टिनिटसची तक्रार करत आहेत, असं कारण देत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गेल्या वर्षी जाहीर केलेल्या दीर्घकालीन कोविड व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये या समस्येचा समावेश केलेला नाही.
महाराष्ट्रातील डॉक्टरचा कोरोनावर जालीम उपाय; खास मीठ हुंगून बरे झाले हजारो रुग्ण
इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील (Indraprastha Apollo Hospitals) मेडिसीन कन्सलटंट डॉ. एस. चटर्जी यांनी, मायोकार्डिटिस आणि फुफ्फुसाच्या समस्यांना दीर्घकाळ टिकणाऱ्या कोविड सिक्वेल (लक्षणं) म्हणून सूचीबद्ध केलं आहे. पण, त्यांनी सर्वात अगोदर टिनिटसचं गांभीर्य अधोरेखित केलं आहे. डॉ. एस. चटर्जींच्या म्हणण्यानुसार, ‘असं बरेच लोक आहेत ज्यांना कोविडमधून रिकव्हर झाल्यानंतर कानांमध्ये विविध आवाज ऐकायला येत आहेत. या समस्येला टिनिटस म्हणतात. कोविडनंतर जाणवणारं हे सामान्य लक्षण आहे. अनेकांना हृदयाची धडधड वाढल्याचंही जाणवत आहे. ही दोन्ही लक्षणं सहा आठवड्यांपासून ते तीन महिन्यांपर्यंत टिकू शकतात. परंतु, गंभीर प्रकरणांमध्ये ते अगदी सहा महिन्यांपर्यंतही टिकू शकतात. दिल्लीच्या सरकारी रुग्णालयातील एका ईएनटी प्रोफेसरनं सांगितलं की, ओपीडी अधूनमधून बंद केल्यामुळे, पोस्ट कोविड टिनिटसबाबत पुरेसे दस्तऐवज उपलब्ध नाहीत. परंतु, ही एक नक्कीच एक गंभीर समस्या आहे. त्यावर वेळेत उपचार झाले नाहीत तर रुग्णाची श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता आहे. मॅक्स स्मार्ट येथील ईएनटी (ENT) विभागाचे प्रमुख डॉ. सुमित मृग यांनी द प्रिंटला सांगितलं की, साधारणपणे एका वर्षात त्यांच्या विभागामध्ये अचानक संवेदनाक्षम श्रवणशक्ती (Sensory Hearing Loss) कमी झाल्याचे 30 ते 40 रुग्ण येताता. परंतु, गेल्या दोन वर्षांमध्ये हे प्रमाण 200 ते 300 पर्यंत गेलं आहे. कोविडच्या सर्व तीन लाटांमधील रुग्णांना टिनिटसचा अनुभव येत आहे. कानाच्या आत असलेल्या केसांच्या पेशींना नुकसान झाल्यामुळे टिनिटस होतो. 24 ते 48 तासांत उपचार सुरू झाल्यास तो तत्काळ पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. परंतु, लॉकडाउन आणि इतर कारणांमुळं बरेच रुग्ण उशिरानं हॉस्पिटलमध्ये आले आहेत, असं डॉ. मृग म्हणाले. डॉ. मृग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभ्यासानुसार कोविड संसर्गानंतर टिनिटसचा प्रसाराचं प्रमाण अंदाजे आठ टक्के आहे. टिनिटसमुळं अनेकांना झोपतानादेखील त्रास होत आहे. कानामध्ये जाणवणाऱ्या सततच्या आवाजामुळं शांत झोप घेणं शक्य नाही. त्यावर लवकरात लवकर उपचार होणं गरजेच आहे. कारण, एकदा जर व्यक्तीची श्रवणशक्ती कमी झाली तर फारसे काही उपचार करता येत नाहीत. एकूणच टिनिटस ही एक गंभीर पोस्ट कोविड समस्या आहे. कोविडमधून रिकव्हर झालेल्या रुग्णांना असा त्रास जाणवत असल्यास, तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.