मुंबई, 4 मार्च : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची (Corona Update) रुग्णसंख्या कमी होत असल्याने लोकांमध्येही कोरोनाची भीती कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणीही नागरिक मास्क लावणं टाळताना दिसत आहे. मात्र आज राज्य सरकार आमि आरोग्य विभागाने चिंता वाढवणारी आकडेवारी शेअर केली आहे. आज राज्यात 525 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद केली आहे. तर ओमायक्रॉनचे (Omicron in pune) 200 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. ही रुग्णांची नोंद पुणे महापालिकेत झाल्याचं सांगितलं जात आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन अहवालानुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ९९२ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,१५,७११ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०७ टक्के इतके आहे. आज राज्यात ५२५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८१,३८,१८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६७,९१६ (१०.०७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २८,८७८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ५९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. हे ही वाचा- कोरोनाची चौथी लाट भारतात येईल का? ICMR च्या शास्त्रज्ञांनी दिलं हे उत्तर गेल्या 24 तासात 206 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 146 रुग्णांची नोंद बी.जे वैद्यकीय महाविद्यालय आणि 60 रुग्णांची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत नोंद करण्यात आली होती. हे सर्व 206 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहे. दरम्यान कोविड तज्ज्ञ डॉ जुगल किशोर म्हणाले की, कोरोना व्हायरस सतत स्वतःला बदलत राहतो. उत्परिवर्तनामुळे, हा व्हायरस नवीन व्हेरिएंटमध्ये बदलू शकतो. जर हा व्हेरिएंट वेगानं पसरला आणि लस किंवा नैसर्गिक प्रतिकारशक्तीला मागे टाकलं तर कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात. दरम्यान नवीन लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण लोकसंख्येचा मोठा भाग ओमायक्रॉन व्हेरिएंटनं संक्रमित झाला आहे. लोकांमध्ये संसर्गाविरूद्ध प्रतिकारशक्ती असते. अशा परिस्थितीत जोपर्यंत धोकादायक व्हेरिएंट येत नाही. तोपर्यंत पुढची लाट येणार नाही. पण यामुळे लोकांना असं वाटू नये की कोरोना आता कायमचा संपला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.