नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : जगात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटने (Delta Variant) पुन्हा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. चीनमध्ये (China) पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) करण्याची गरज निर्माण झाली आहे, तर अमेरिकेतही (America) कोरोना रुग्णांची (Corona patients) संख्या वाढत असून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. डेल्टा व्हायरसचा प्रकोप या दोन्ही देशांत सुरु होत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे.
चीनमध्ये उद्रेक
चीनच्या वेगवेगळ्या प्रांतात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. चीनच्या झियामेन शहरात गेल्या दोन दिवसात 33 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर पुतीयानमध्ये 59 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही भागात चीनने अंशतः लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या भागातील मॉल, जिम आणि इतर गर्दीची ठिकाणं बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. चीनमध्ये सध्या ‘मिड ऑटम फेस्टिव्हल’ची तयारी सुरू आहे. मात्र वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यातील बहुतांश कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. चीनमधील लांब पल्ल्याल्या बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. एका भागातून दुसऱ्या भागात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
हे वाचा - क्रिकेटप्रेमींनो लक्ष द्या! कोरोना लस घेतली असेल तरच पाहता येणार IPL 2021
अमेरिकेत कडक निर्बंध
अमेरिकेत डेल्टा व्हेरियंटचा प्रभाव वाढत असल्यामुळे जो बायडेन प्रशासनाने नवे निर्बंध लागू केले आहेत. सर्व सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ज्या कंपन्यांमध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, त्यांना प्रत्येक कर्मचाऱ्याचं लसीकरण करावं लागेल किंवा दर आठवड्याला प्रत्येक कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट करावी लागेल, असा नियम घालण्यात आला आहे. अमेरिकेत लहान मुलांना डेल्टाची लागण होण्याचं प्रमाण वाढत असून गेल्या काही दिवसांत अनेक लहान मुलांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, China, Coronavirus