हा घातक आजार पुन्हा डोकं वर काढतोय, कोरोनातून बरं झालेल्यांना होतोय संसर्ग; मृत्यूदर 50 टक्के

हा घातक आजार पुन्हा डोकं वर काढतोय, कोरोनातून बरं झालेल्यांना होतोय संसर्ग; मृत्यूदर 50 टक्के

हा संसर्ग झाल्यास मृत्यूदर 50 टक्के आहे, असं म्हटलं जातं. मात्र संसर्ग लवकरच्या टप्प्यात ओळखता आला तर उपचारांमधून रुग्ण (Patient) बरा होऊ शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली 07 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयावह रूप धारण केलेलं असतानाच दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये कोरोनातून बऱ्या होत असलेल्या रुग्णांना ब्लॅक फंगस (Black Fungus) अर्थात म्युकॉर्मायकॉसिस (Mucormycosis) हा घातक बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection) होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं आढळून आलं आहे. कोविड-19मुळे या संसर्गाला चालना मिळत असून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या हॉस्पिटलमध्ये या संसर्गाचे रुग्ण आढळले होते. तसंच या संसर्गामुळे काही रुग्णांना दृष्टी गमवावी लागली होती.

सर गंगाराम हॉस्पिटलमधले ज्येष्ठ कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. मनीष मुंजाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत या हॉस्पिटलमध्ये म्युकॉर्मायकॉसिसच्या सहा रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. 'सध्या पुन्हा या संसर्गाचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून आलं आहे. कोविड-19 मधून बऱ्या होत असलेल्या रुग्णांमध्ये हा संसर्ग दिसून येतो. गेल्या वर्षी या संसर्गामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. अनेकांची दृष्टी गेली होती. तसंच काही जणांचं नाकाचं आणि जबड्याचं हाड काढावं लागलं होतं,' अशी माहिती डॉ. मुंजाल यांनी दिली.

म्युकॉर्मायकॉसिस म्हणजे काय?

या विकाराला झायगोमायकॉसिस (Zygomycosis) म्हणूनही ओळखलं जातं. सेंटर फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन अर्थात सीडीसीच्या (CDC) म्हणण्यानुसार,हा बुरशीजन्य संसर्ग दुर्मिळ आहे. म्युकॉर्मायसिट्स (Mucormycetes) नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते, मात्र जेव्हा मानवी शरिराची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, तेव्हाच तिचा संसर्ग शरीरात होतो. ही धोकादायक बाब आहे. या बुरशीचे कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुप्फुसं, तसंच सायनस यांच्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. खुल्या जखमांमधूनही ही बुरशी शरीरात प्रवेश करू शकते. ही बुरशी बहुतांश माणसांसाठी धोकादायक नाही. मात्र ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, अशा व्यक्तींच्या श्वसनातून ती शरीरात गेल्यास फुप्फुसे (Lungs) किंवा सायनसमध्ये (Sinus) त्यांचा संसर्ग होऊ शकतो आणि शरीराच्या अन्य भागांतही तो पसरू शकतो, असं सी़डीसीनं म्हटलं आहे.

म्युकॉर्मायकॉसिसची लागण संसर्गजन्य (Contagious) नाही, म्हणजेच एकापासून दुसऱ्याला किंवा प्राण्यांपासून माणसाला त्याची लागण होत नाही, असंही सीडीसीनं स्पष्ट केलं आहे. लवकर योग्य निदान आणि योग्य बुरशी प्रतिकारक उपचार करणं हे पेशंट्स लवकर बरे होण्यासाठी आवश्यक असल्याचं सीडीसीनं म्हटलं आहे.

कोणाला संसर्ग होऊ शकतो?

सर गंगाराम हॉस्पिटलच्या कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजय स्वरूप यांच्या म्हणण्यानुसार,कोविड-19 झालेल्या आणि त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांना म्युकॉर्मायकॉसिसचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.

'कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर उपचारांमध्ये स्टेरॉइड्सचा वापर, डायबेटीस किंवा अन्य को-मॉर्बिडिटी असलेले रुग्ण आदींमध्ये या ब्लॅक फंगसचा संसर्ग पुन्हा वाढू लागला असण्याची शक्यता आहे,'असं डॉ. स्वरूप म्हणाले.

उपचार

हा संसर्ग झाल्यास मृत्यूदर 50 टक्के आहे, असं म्हटलं जातं. मात्र संसर्ग लवकरच्या टप्प्यात ओळखता आला, तर उपचारांमधून रुग्ण बरा होऊ शकतो.

सर गंगाराम हॉस्पिटलमधले कन्सल्टंट ईएनटी सर्जन डॉ. वरुण राय यांनी याबद्दल गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये माहिती दिली होती. 'श्वासास अडथळे निर्माण होणं, डोळ्याला किंवा गालांना सूज येणं, नाकात काळे सुके क्रस्ट्स (Crusts) तयार होणं ही याची प्राथमिक लक्षणं असून तातडीने बायोप्सी (Biopsy)करून अँटीफंगल ट्रीटमेंट (Antifungal Treatment) अर्थात बुरशीला प्रतिकार करणारी उपचारपद्धती अवलंबणं आवश्यक आहे,' असं त्यांनी सांगितलं होतं.

यंदा मुंबईतल्या एका बायो-फार्मास्युटिकल कंपनीला म्युकॉर्मायकॉसिसवर उपचारांसाठी अँटी-फंगल औषध वापरण्यास औषध महानियंत्रकांकडून परवानगी मिळाली आहे. भारत सिरम्स अँड व्हॅक्सिन्स लिमिटेड असं त्या कंपनीचं नाव असून, म्युकॉर्मायकॉसिसच्या रुग्णांवर Liposomal Amphotericin B किंवा LAmB हे अँटी-फंगल औषध वापरण्यासाठी 'ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'कडून (DGCI)परवानगी मिळालेली ती पहिली कंपनी ठरली आहे. 'आयएएनएस' वृत्तसंस्थेने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

भारत सिरम्स अँड व्हॅक्सिन्स (BSV)या कंपनीचे सीओओ विश्वनाथ स्वरूप यांनी सांगितलं, 'BSV या कंपनीने वर उल्लेख केलेलं अँटी-फंगल औषध स्वतः भारतातच विकसित केलं असून निर्मितीही इथेच केली आहे. म्युकॉर्मायकॉसिससारख्या प्राणघातक संसर्गावर उपचारांसाठी त्याचा वापर होऊ शकतो. या रुग्णांवर हे औषध वापरल्यास सर्जरीपर्यंत जाण्याची वेळ येणार नाही.'

हा संसर्ग गेल्यावर्षी अहमदाबाद आणि बेंगळुरूमध्ये आढळला होता. अहमदाबादमध्ये पाच जणांना हा संसर्ग झाल्याचं आढळलं होतं. ते रुग्ण कोरोनातून नुकतेच बरे झाले होते किंवा त्यांना कोरोना संसर्ग झालेला होता. त्या पाचपैकी दोघांचा मृत्यू झाला तर दोघांची दृष्टी गेली होती. बेंगळुरूमध्ये आढळलेल्या चौघांपैकी दोघांचा मृत्यू झाला होता.

Published by: Kiran Pharate
First published: May 7, 2021, 2:22 PM IST

ताज्या बातम्या