मुंबई, 23 फेब्रुवारी : गेल्या दोन वर्षांपासून जग कोरोनाचा (Corona) सामना करत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर संशोधन सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लसीकरणावर (Vaccination) भर दिला जात आहे. आतापर्यंत कोरोनाचे अल्फा, बीटा, डेल्टा आणि ओमिक्रॉन आदी व्हॅरिएंट्स (Variant) आढळून आले आहेत. जगभरात मोठ्या संख्येने नागरिक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीवर एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोविड-19 चा (Covid-19) सामना करत असलेल्या रुग्णांमध्ये विषाणूचा (Virus) प्रभाव 'गट बॅक्टेरिया' (Gut Bacteria) कमी करू शकतात आणि त्यामुळे रुग्ण लवकर बरे होतात.
कोविड-19 चा सामना करत असलेल्या रुग्णांमधला विषाणूचा प्रभाव काही जिवाणू कमी करू शकतात आणि त्यामुळे रुग्ण लवकर बरे होऊ शकतात, असा दावा गट मायक्रोब्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात करण्यात आला आहे. हे संशोधन इंग्लंडमधल्या प्लायमाउथ युनिव्हर्सिटीच्या (Plymouth University) संशोधकांनी केलं असून, याची ट्रायल यशस्वी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शरीरासाठी फायदेशीर असणारे हे बॅक्टेरिया अर्थात जिवाणू गट बॅक्टेरिया (आतड्यातील) म्हणून ओळखले जातात. खास सूप किंवा कॅप्सूलच्या माध्यमातून शरीरातली त्यांची संख्या वाढवल्यास रुग्ण कोविड-19 मधून लवकर बरा होऊ शकतो.
हे वाचा - महाराष्ट्रातील डॉक्टरचा कोरोनावर जालीम उपाय; खास मीठ हुंगून बरे झाले हजारो रुग्ण
कोविड-19 झालेल्या रुग्णांची रिकव्हरी (Recovery) गट बॅक्टेरियामुळे कशी वेगाने होते, हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी कोरोनाशी झुंज देत असलेल्या 16 ते 60 वर्षं वयोगटातल्या 300 रुग्णांवर संशोधन केलं. यापैकी 50 रुग्णांना प्रो-बायोटिक कॅप्सूल (Probiotic Capsules) देण्यात आली. 50 टक्के रुग्णांवर सामान्य पद्धतीनं उपचार केले गेले. प्रो-बायोटिक कॅप्सूलमुळे शरीरातल्या बॅक्टेरियाची संख्या वाढते. यामुळे शरीराला फायदा होऊन, रोगाशी लढण्याची शक्ती वाढते.
या संशोधनात सहभागी झालेल्या प्रो-बायोटिक कॅप्सूल उत्पादक कनेका कंपनीचा दावा आहे, की शरीरात चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवल्याने केवळ रिकव्हरीच वेगात होत नाही तर व्हायरस लोडही (Virus Load) कमी होतो. याचाच अर्थ शरीरातली विषाणूंची संख्या आणि त्याचा प्रभावही कमी होतो.
"ज्या 50 टक्के म्हणजेच 147 रुग्णांना प्रो-बायोटिक कॅप्सूल देण्यात आली होती, त्यांच्यातली लक्षणं एका महिन्यात दूर झाली. या रुग्णांना Probio7 AB21 सप्लिमेंट देण्यात आलं होतं. त्यात बॅक्टेरियाचे चार स्ट्रेन होते. त्यापैकी तीन लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया होते", असं संशोधकांनी सांगितलं.
हे वाचा - Corona Vaccine: 2 ते 6 वर्षांच्या मुलांना लवकरच मिळणार Coronaची लस, Covovaxची ट्रायल सुरू
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, "कॅप्सूलच्या साह्याने जेव्हा गट बॅक्टेरिया शरीरात योग्य प्रमाणात पोहोचवला जातो, तेव्हा यामुळे रोगांशी लढण्याची शरीराची क्षमता म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढते. नेदरलॅंडमधल्या संशोधकांना दहा वर्षांपूर्वी बॅक्टेरियाच्या या गुणधर्माविषयी माहिती मिळाली होती. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारा हा बॅक्टेरिया शरीरातली सूज कमी करण्याचंही काम करतो" या संशोधनामुळे कोरोनावरच्या उपचारांना नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे, असं वृत्त टीव्ही 9 हिंदीने दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus