देहरादून 14 मे : देशभरात कोरोनानं (Coronavirus) अक्षरशः हाहाकार घातला आहे. या महामारीनं अनेकांची बळी घेतले आहेत, तर अनेकांना रस्त्यावर आणलं आहे. या परिस्थितीत कोरोनाबाबत उत्तराखंडच्या (Uttarakhand) माजी मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणू हादेखील एक प्राणी आहे आणि त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. माजी मुख्यमंत्र्यांचं हे विधान सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलंच चर्चेत आहे. यावरुन त्यांच्यावर टीकाही होत आहे. मात्र, कोरोनाबाबत अजब विधान करणारे रावत एकटे नाहीत, तर याआधीही अनेकांनी अशी विधानं केली आहेत. एका माध्यमासोबत बातचीत करताना रावत म्हणाले, की हा विषाणूदेखील एक प्राणी आहे आणि आपणही. आपण स्वतःला सर्वाधिक बुद्धीमान समजतो मात्र त्या प्राण्यालाही जगण्याची इच्छा आहे आणि तो त्याचा अधिकार आहे. रावत एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढे ते म्हणाले, आपण कोरोनाच्या मागे लागलो आहोत आणि तो रूप बदलतोय. तो बहुरुपी झाला आहे, त्यामुळे त्याच्यापासून अंतर ठेवून राहावं लागेल. माजी मुख्यमंत्री कोरोनाबाबत बोलताना म्हणाले, तूदेखील चालत राहा आणि आम्हीही चालत राहातो. फक्त आपल्याला त्याच्यापेक्षा वेगानं चालावं लागेल. जेणेकरुन तो मागे राहील. आपण याबद्दल विचार करण्याची गरज आहे. तोदेखील एक जीव आहे आणि स्वतःला वाचवण्यासाठी तो वारंवार आपलं रूप बदलत आहे. भाजप नेते रावत यांचं हे विधान सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. मात्र, त्यांच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे, की माजी मुख्यमंत्र्यांमी लोकांना कोरोनापासून बचावासाठी सल्ला दिला आहे. कोरोनाबाबत विधानात मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूरदेखील मागे नाहीत. नुकतंच त्यांनी म्हटलं होतं, की यज्ञ केल्यास कोरोनाची तिसरी लाट भारतात येणारही नाही. त्यांनी म्हटलं होतं, की ही अंधश्रद्धा नाही, तर पर्यावरण शुद्ध करण्यासाठीचा उपाय आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सर्व जागरुक आहेत आणि आपण या लाटेवरही मात करू. कारण जेव्हा सगळे मिळून प्रयत्न करत असतात तेव्हा संकटही दूर होतात, असंही त्यांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.