• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • चव्हाण कुटुंब उद्ध्वस्त! आधी आजी-आजोबा, मग बाबा आणि दुसऱ्याच दिवशी उच्चशिक्षित तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू

चव्हाण कुटुंब उद्ध्वस्त! आधी आजी-आजोबा, मग बाबा आणि दुसऱ्याच दिवशी उच्चशिक्षित तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाच्या विळख्यात सापडून एकाच कुटुंबातील तब्बल चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:
चिपळूण, 3 जून : कोरोनाच्या विळख्यात (Corona death) सापडून एकाच कुटुंबातील तब्बल चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर चिपळूणमध्ये प्रचंड घबराट पसरली असल्याचे पाहायला मिळत आहे. चिपळूणमधील पिंपळी गजमल येथील रहिवासी असलेले मारुती चव्हाण, त्यांचे आई-वडील आणि एक तरुण मुलगा कोरोनाचे बळी ठरलेत. मारुती चव्हाण हे मूळचे कर्नाटकचे, मात्र व्यवसायाच्या निमित्ताने ते काही वर्षांपूर्वी रत्नागिरीतल्या खेड येथे आले. तिथे त्यांनी अनेक वर्षे छोटी मोठी कामे करून कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे हाकला. नंतर ते चिपळूणमध्ये शिफ्ट होऊन खासगी आणि शासकीय बांधकामांचा ठेका घेऊ लागले. या व्यवसायात त्यांचा व्यवस्थित जम बसला. पुढे त्यांनी डांबर पुरवठा सुरू केला. या सगळ्या यशस्वी प्रवासानंतर मारुती चव्हाण यांनी चिपळुणात घर घेत तिथेच स्थायिक झाले. त्यांचा मुलगा पद्मन चव्हाण हा देखील उच्च शिक्षित होता. मात्र या हसत्या खेळत्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला आणि बघता बघता घरातल्या चौघांना कोरोनाने आपली शिकार केले. हे ही वाचा-धक्कादायक! कोरोनाने चिमुकल्याचं 90% फुफ्फुस पोखरून काढलं, तरी टेस्ट निगेटिव्ह सर्वात आधी मारुती चव्हाण यांचे वडील बाळू चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांची आई आणि मग स्वत: मारुती चव्हाण असे तिघेजण पॉसिटीव्ह असताना रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र तिघांच्याही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे टप्याटप्याने तिघांचाही मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरतो तोच मारुती चव्हाण यांचा मुलाचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. त्याला उपचारासाठी तत्काळ मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र 1 जून रोजी त्याचाही उपचारादरम्यान मृत्य झाला. यामुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात हळहळ व्यक्त होते आहे. चिपळूण तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असून कोरोना रुग्ण सापडण्याच्या तसेच कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या यादीत चिपळूण तालुक्याचा जिल्ह्यात दुसरा नंबर आहे. चिपळूणमध्ये नियमित स्वरूपात सापडणारे असंख्य कोरोनाचे रुग्ण हा चिपळूण तालुक्यातील नागरिकांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. याच पार्श्वभूमीवर चिपळूणमधील प्रशासन देखील हादरलं असून कोरोनाला रोखण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत.
Published by:Meenal Gangurde
First published: