नवी दिल्ली 08 मे : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Second Wave of Coronavirus) थैमान घातलं आहे. दररोज हजारो रुग्णांचा जीव जात आहे. तर, लाखो नवीन रुग्ण समोर येत आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फेक न्यूज (Fake News) पसरताना पाहायला मिळत आहे. पीआयबीकडून सतत अशा फेक दाव्यांची पोलखोल केली जाते. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक मेसेज व्हायरल (Viral Message) होत आहे. यात असं म्हटलं गेलं आहे, की पुढील 20 तास भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. फेक न्यूज पसरवणाऱ्यानं यात आयसीएमआरचा उल्लेखही केला आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये लिहिलं आहे, की WHO नं ICMR ला सांगितलं आहे, की पुढील 20 तासात भारतीयांनी ही परिस्थिती गंभीर घेऊन ते सुधारले नाहीत तर देश तिसऱ्या लाटेत प्रवेश करेल. पीआयबीनं या मेसेजचं फॅक्ट चेक केलं आहे. यात हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. पीआयबीनं अशा प्रकारचे फेक मेसेज फॉरवर्ड किंवा शेअर कऱण्यापासून वाचण्याचा सल्ला दिला आहे. पीआयबीनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, की एका फेक मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे, की कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहाता WHO नं भारताला इशारा दिला आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेनं याआधीही स्पष्टीकरण दिलं आहे. कृपया असा कोणताही मेसेज फॉरवर्ड करू नका.
एक #फ़र्ज़ी मैसेज में दावा किया जा रहा है कि #COVID19 के बढ़ते मामलों को मद्देनजर रखते हुए #WHO की तरफ से भारत को चेतावनी दी गई है।
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 8, 2021
इस पर @WHOSEARO द्वारा पहले भी स्पष्टीकरण जारी किया गया है। कृपया ऐसे किसी मैसेज को फॉरवर्ड न करें।
पढ़ें:https://t.co/LFR4NgHfDR#PIBFactCheck pic.twitter.com/7FL1cGYPVh
भारतात कोरोनाचा प्रकोप - सध्या देशात कोरोना रुग्णांच्या (Corona Cases in India) संख्येत रोज मोठी वाढ नोंदवली जात आहे. इतकंच नाही तर मृतांचा आकडाही वाढत असल्यानं चिंतेत भर पडली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. भारतात सध्या दररोज सुमारे 4 हजार रुग्णांचा मृत्यू होत आहे. शुक्रवारीही सलग तिसऱ्या दिवशी देशात चार लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी देशात कोरोनाचे नवे 4,01,228 रुग्ण आढळले आहेत. यानंतर एकूण बाधितांची संख्या 2,18,86,611 वर पोहोचली आहे. देशात सध्या 37 लाखाहून अधिक रुग्ण या महामारीच्या विळख्यात आहेत.