नवी दिल्ली, 11 जानेवारी : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Variant) संसर्गाची भीती अगोदर वाटत होती तेवढी आता राहिली नसल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने पसरत असला, तरी त्याच्यामुळे गंभीर आजार होण्याचं प्रमाण कमी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे; मात्र त्या संदर्भातली आणखी एक गोष्ट आता पुढे आली असून, ती चिंता वाढवणारी आहे. डेल्टापेक्षा ओमिक्रॉनचा लहान मुलांना जास्त धोका आहे (Omicron Variant in children) . यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन अर्थात सीडीसी (CDC) या संस्थेकडे असलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात दररोज सरासरी 672 कोविड-19 बाधित बालकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या महासाथीच्या काळातली ही सर्वांत मोठी आकडेवारी आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा बालकांना जास्त धोका आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. हे वाचा - …तर कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्यांची टेस्ट करण्याची गरज नाही - मोदी सरकार आज तक च्या वृत्तानुसार गुरुग्राममधल्या नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधले इंटर्नल मेडिसीन विषयातले सीनियर कन्सल्टंट तुषार तायल यांनी सांगितलं, “आधीच्या व्हेरिएंट्सच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग मुलांमध्ये जास्त प्रमाणात होत आहे. तज्ज्ञ म्हणतात, की ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या मुलांमध्ये मोठ्या व्यक्तींसारखीच म्हणजे सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणं दिसत आहेत” नवी दिल्लीतल्या श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये रेस्पिरेटरी मेडिसीन विषयातले सीनियर कन्सल्टंट असलेले अनिमेश आर्या म्हणाले, “लहान मुलांचा श्वसनमार्ग प्रौढांच्या तुलनेत लहान असतो. ओमिक्रॉन व्हेरिएंट रुग्णांच्या अपर रेस्पिरेटरी ट्र्रॅक्टवरच जास्त परिणाम करतो आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये या व्हॅरिएंटमुळे त्रास वाढण्याची शक्यता आहे” हे वाचा - डेल्टा, ओमिक्रॉननंतर आता डेल्टाक्रॉन; नेमका काय आहे कोरोनाचा हा नवा प्रकार? या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी सांगितलं आहे, की मुलांच्या सुरक्षेसाठी आपण आधीपासूनच तयारीत राहणं आवश्यक आहे. मुलांमध्ये दिसणारी ओमिक्रॉनची लक्षणं (Symptoms) प्रौढांच्या तुलनेत फारशी वेगळी नाहीत. मुलांना शक्य तितका वेळ घरातच ठेवणं सर्वांत महत्त्वाचं आहे. त्यांच्या पोषक आहारात खंड पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांना संसर्ग झाला, तरी शरीराला त्या संसर्गाशी लढण्याची ताकद मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.