नवी दिल्ली, 26 जून : कोरोनाच्या (corona) तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना एक चांगली बातमी आहे. कोवोव्हॅक्स (Covovax) लशीची लवकरच लहान मुलांवर चाचणी केली जाणार असल्याचं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) स्पष्ट केलं आहे. त्यासाठी कंपनी लवकरच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) या नियामक संस्थेकडे परवानगीसाठी अर्ज करणार असल्याची शक्यता आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींवर लशी घेतल्या जात असलेल्या चाचणीचा तिसरा टप्पा 18 जूनपासून सुरू झाला आहे. नोव्हाव्हॅक्स कंपनी सिरम इन्स्टिट्यूटसह लस उत्पादन करणार असल्याचं सप्टेंबर 2020मध्ये जाहीर केलं होतं. या दोन्ही कंपन्यांनी मिळून विकसित केलेली ही लस आहे. सिरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादित केली जात असलेली ही दुसरी कोरोनाप्रतिबंधक लस आहे. सिरम इन्स्टिट्यूट सध्या ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांच्यासह कोविशिल्ड लशीचं उत्पादन करत आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी शुक्रवारी (25 जून) याबद्दल एक ट्विट केलंय. त्या ट्विटमध्ये म्हटलंय, की, ‘आम्ही एक नवा टप्पा गाठलाय. या आठवड्यात आम्ही कोवोव्हॅक्स लशीची पहिली बॅच तयार करणं सुरू केलंय. पुण्यातल्या आमच्या कंपनीत तयार होणाऱ्या कोवोव्हॅक्स लशीची पहिली बॅच पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या लशीत 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या भावी पिढ्यांचं संरक्षण करण्याची क्षमता आहे.’ हे ही वाचा- Corona vaccine न घेणं पडलं महागात? लसीकरण न झालेल्या 98% कोरोनाग्रस्तांचा मृत्यू मुलांवर चाचण्या इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीला 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवर लशीची चाचणी घेतली जाईल. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर चाचणी घेण्यात येईल. महत्त्वाचं म्हणजे भारत बायोटेक कंपनीनेदेखील कोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्या लहान मुलांवर सुरू केल्या आहेत. सध्या जगभरातल्या अनेक देशांमध्ये 12 ते 18 वर्षं वयोगटातील मुलांना फायझर कंपनीची लस दिली जात आहे. आतापर्यंतच्या चाचण्यांचे निष्कर्ष कोवोव्हॅक्स लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीचे निष्कर्ष चांगले असल्याचं या महिन्याच्या सुरुवातील नोवाव्हॅक्स कंपनीने जाहीर केलं होतं. या चाचण्या अमेरिका आणि मेक्सिकोमधल्या 119 ठिकाणी केल्या गेल्या. या चाचण्यांमध्ये 29 हजार 960 जण सहभागी झाले होते. चाचण्यांनंतर मिळालेल्या डेटानुसार, ही लस 90.4 टक्के प्रभावी आहे. काही दिवसांपूर्वी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबत भाष्य केलं होतं. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं पॉल त्या वेळी म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.