Corona चा प्रसार उन्हाळ्यात खरंच कमी होतो का? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

Corona चा प्रसार उन्हाळ्यात खरंच कमी होतो का?  तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

मागील वर्षी कोरोनानं (Corona Virus) देशात प्रवेश केला तेव्हा असं म्हटलं गेलं, की उन्हाळा सुरू होताच प्रसारामध्ये कमी येईल. मात्र, प्रत्यक्षात उलट घडलं. त्यामुळं या गोष्टीत कितपत तथ्य आहे, असा सवाल उपस्थित होऊ लागला.

  • Share this:

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona Virus) प्रसार झपाट्यानं वाढत असल्यानं जाणकारही चिंतेत आहेत. आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षीचं रेकॉर्ड जर पाहिलं तर वातावरण किंवा हवामान ठीक राहिलं तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. याशिवाय कोरोनाची नवीन तीन रुपं अधिकच घातक ठरू शकतात, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या कोविड टास्क फोर्स ऑपरेशन ग्रुपचे प्रमुख डॉ. एन के अरोरा म्हणाले, की व्हायरसशी संबंधित सर्व आजार लहरीसारखे येतात. त्यांचा हवामान किंवा काळाशी काही संबंध नाही. कोरोना विषाणूच्या संदर्भात असं दिसून आलं आहे, की यासंदर्भातील हवामानाबाबत काढलेले अंदाज चुकीचे असल्याचं सिद्ध झालं आहे.

मागील वर्षी कोरोनानं देशात प्रवेश केला तेव्हा असं म्हटलं गेलं, की उन्हाळा सुरू होताच प्रसारामध्ये कमी येईल. मात्र, प्रत्यक्षात उलट घडले. यानंतर असं सांगितलं जात होतं, की हिवाळ्यात प्रकरणं वाढू शकतात, परंतु तसं झालं नाही. त्यामुळे   या विषाणूचा उष्णता किंवा थंडीशी काहीही संबंध नाही. तो एका लाटेच्या रुपात पसरत आहे.

कोरोना प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ होण्याचं आणखी एक कारण म्हणजे कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर आणि लस आल्याची बातमीमुळे लोकांनी काळजी घेणं सोडून देत सर्रास बाहेर फिरण्यास सुरुवात केली. लस घेण्याआधीच आता कोरोना आपलं काहीही वाकडं करु शकत नाही, असं मनात धरुन लोक बाहेर पडू लागले. ही बाब चिंताजनक आहे.

जानेवारीत सीरोच्या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे, की देशातील केवळ 25 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांच्यामध्ये अँटीबॉडिज तयार झाल्या आहेत. याचाच अर्थ 75 टक्के लोक अजूनही कोरोनाच्या प्रसाराला बळी पडू शकतात.  कोरोनाची प्रकरणं पुन्हा एकदा वाढू लागल्यानं या महामारीनं पुन्हा गेल्या वर्षीसारखं मोठं रुप धारणं करु नये, अशी शंका व्यक्त होत आहे.

डॉ. एन के अरोरा म्हणाले, की मागील काही दिवसांपासून अशा राज्यांमध्येही मास्क आणि इतर नियम पायदळी तुडवले जात आहेत, जिथे कोरोनाचा प्रसार खूप जास्त आहे. दिल्लीमध्येही मास्कच्या बाबतीतील नियम आता पहिल्यासारखे कडक नाही. इतकंच नाही तर सार्वजनिक ठिकाणं आणि कार्यक्रमांमधील गर्दीही आता वाढू लागली आहे. सोशल डिस्टन्सिंगचं कुठेही पालन होताना दिसत नाही. याच कारणांमुळे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Published by: Kiran Pharate
First published: February 26, 2021, 2:24 PM IST

ताज्या बातम्या