लखनऊ 09 मे: कोरोना काळात (Coronavirus) अनेक रुग्णालयांचा (Hospital) भोंगळ कारभार समोर येत आहे. जीवंत रुग्णालाच (Patient) मृत घोषित केल्याच्या अनेक भयंकर घटनाही समोर आल्या आहेत. अशात आता आणखी एक समोर आलेली घटना ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. या घटनेत पंधरा दिवासाआधीच मृत्यू झालेल्या रुग्णाच्या (Corona Patient) नातेवाईकांनी रुग्ण बरा असल्याची माहिती दिली जात होती. मात्र, जेव्हा रुग्णाची मुलगी हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघड झाला. ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या एलएलआरएम मेडिकल कॉलेजमधील (Medical College). गुरुवारी या प्रकरणात खुलासा झाला की रुग्णाचा 23 एप्रिललाच मृत्यू झाला आहे. मेडिकल प्रशासनाचा असा दावा आहे, की त्याच काळात मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत. मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी आपली चूक मान्य करत चौकशी समिती स्थापन केली आहे. सुरुवातीच्या चौकशीदरम्यान संतोष कुमार यांचा 23 एप्रिलला मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. संतोष कुमार 21 एप्रिलला सकाळी 11 वाजता मेडिकल मेरठच्या कोविड वार्डात भर्ती झाले. मुलगी शिखा शिवांगी हिनं दिलेल्या माहितीनुसार, ती दररोज कंट्रोल रुममध्ये फोन करुन आपल्या वडिलांच्या प्रकृतीची चौकशी करत होती. तीन मेनंतर तिला काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे, ती मेरठ येथे आली. कोविड वार्डात संतोषची काहीही माहिती मिळाली नाही. मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य़ांचं म्हणणं आहे, की मृतदेहावर संतोषच्या नावानं त्याचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कोविड वार्डात संतोष कपूर आणि संतोष कुमार नावाचे दोन रुग्ण दाखल होते. संतोष कुमार यांचा मृत्यू 23 एप्रिल रोजी झाला होता. एकाच नावाचे दोन रुग्ण असल्यानं स्टाफकडून हा गोंधळ झाला. संतोष कपूर यांच्या प्रकृतीबाबतची माहिती ते संतोष कुमार यांच्या कुटुंबीयांना देत राहिले. चौकशी समितीचा रिपोर्ट येताच योग्य कारवाई केली जाईल, अशी माहिती मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ज्ञानेंद्र कुमार यांनी दिली. मेरठचे एसएसपी अजय साहनी यांनी सांगितलं, की रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मेडिकल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले आहेत. कुटुंबीयांनी काही तक्रार दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.