नवी दिल्ली, 30 जुलै : जगभरात आता अनेक नागरिकांनी कोरोनाच्या लसी (Corona vaccination) घेतल्या आहेत. लसीकरणाच्या स्टेटसचा विचार केला, तर त्यात तीन श्रेणी (Three Stages) आहेत. लस न घेतलेले, (not vaccinated) लसीचा पहिला डोस घेतलेले (Single vaccine) आणि लसीचे दोन्ही डोस घेतलेले. (Fully vaccinated) या तिन्ही प्रकारच्या नागरिकांमध्ये कोरोनाची वेगवेगळी लक्षणं (Sysmptoms) आढळून येत असल्याचं एका अभ्यासातून सिद्ध झालं आहे.
युकेतील हेल्थ सायन्स कंपनी ZOE नं 40 लाख नागरिकांचा समावेश असलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढला आहे. कोरोनाची लक्षणं दर काही महिन्यांनी बदलत असल्याचंही त्यातून दिसून आलं आहे. कोरोनाचं आगमन झालं त्या काळात केवळ ताप आणि कोरडा खोकला होत होता. त्यानंतर अंगदुखी, डोकेदुखी सुरु झाली. काही दिवसांनी वास जाणे, चव जाणे याचे अनुभव नागरिकांना येऊ लागले. त्यानंतरच्या काळात असह्य डोकेदुखी आणि शरीरातील इतर अवयवांवर कोरोना विषाणू परिणाम करत असल्याचं दिसून आलं. आता लसीकरणाच्या अवस्थेनुसार वर्गीकरण केलं असता, प्रत्येक वर्गात वेगवेगळी लक्षणं दिसून येत असल्याचं सिद्ध झालं आहे.
लस न घेतलेल्यांमधील लक्षणे
लस न घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची सर्वात तीव्र लक्षणं दिसतात. यामध्ये डोकेदुखी, घसा दुखणे, खोकला, नाक वाहणे, ताप, वास जाणे, चव जाणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे, ही लक्षणं दिसून येतात.
एक लस घेतल्यांमधील लक्षणे
ज्यांनी ळ प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांमध्ये लस न घेतल्यांच्या तुलनेत कमी तीव्र लक्षणं दिसतात. अशा नागरिकांना डोकेदुखी, नाक वाहणे, सौम्य स्वरुपात घसा दुखणे, शिंका येणे आणि सततचा खोकला ही लक्षणे दिसतात.
दोन्ही डोस घेतलेल्यांमधील लक्षणे
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये डोकेदुखी, घशात खवखवणे, शिंका येणे, सर्दी, सौम्य स्वरुपात नाक वाहणे, वास जाणे, सौम्य स्वरुपाचा खोकला आणि सौम्य स्वरुपाचा ताप अशी लक्षणे दिसतात.
हे वाचा -मुंबईत लसीकरणाची नवी मोहिम, आजपासून पालिकेकडून चाचणीला सुरुवात
लक्षणांकडे दुर्लक्ष नको
लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही कोरोना होऊ शकतो. त्यामुळे कुणीही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता टेस्ट करून खातरजमा करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.