नवी दिल्ली, 3 मे : कोविड-19 महामारीने साधारणपणे दोन वर्ष जगाला वेठीला धरलं होतं. हळूहळू तिचा प्रादूर्भाव कमी होत होता. पण कोविड विषाणूचे नवनवे व्हेरियंट येत होते आणि पुन्हा प्रादूर्भावाचा धोका निर्माण होत होता. कोविडच्या ओमिक्रॉन या व्हेरियंटचा सब व्हेरियंट एक्सई (Omicron sub-variant XE) भारतात आल्याचं बोललं जात होतं. काही आठवड्यांपूर्वी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एक्सई व्हेरियंटच्या केसेस सापडल्याची माहिती मिळाली होती पण त्या पेशंटना एक्सईचीच लागण झाल्याचं निश्चित झालं नव्हतं.
आता मात्र भारतात ओमिक्रॉन एक्सई व्हेरियंटचा नमुना सापडल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय SARS-CoV2 जीनोमिक्स सिक्वेन्सिंग कन्सॉर्शियम (Indian SARS-CoV2 Genomics Sequencing Consortium (INSACOG इन्साकॉग)) या सरकारी नेटवर्कमधील शास्रज्ञांनी एक्सईचा भारतात शिरकाव झाल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच महाराष्ट्रात सापडलेला नमुना एक्सई व्हेरियंटचा नसल्याचंही म्हटलं आहे. भारत सरकारने सगळ्या राष्ट्रीय चाचणी प्रयोगशाळांचं एक नेटवर्क तयार करण्यासाठी इन्साकॉगची स्थापना केली आहे. द इंडियन एक्सप्रेसनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
ओमिक्रॉनच्या इतर लिनिएजमधील (Omicron Lineage) सब व्हेरियंटच्या तुलनेत एक्सई व्हेरियंटमुळे होणारं इन्फेक्शन खूप वेगळं असल्याचं सांगता येईल असा कुठलाही पुरावा अद्याप मिळालेला नाही. जानेवारी महिन्यात कोविडची तिसरी लाट येण्यास कारणीभूत ठरलेला आणि सध्या प्रचंड प्रादूर्भाव करणाऱ्या ओमिक्रॉनच्या BA.2 या व्हेरियंटपेक्षा केवळ 10 टक्के अधिक प्रमाणात एक्सईचा प्रादूर्भाव होऊ शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
याबाबत सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, देशात आतापर्यंत अनेक रिकाँबियंट व्हेरियंट्स आढळून आले आहेत. हे सगळे व्हेरियंट्स भौगोलिकदृष्ट्या भिन्न अशा भागांत सापडले आहेत. क्लस्टर स्वरूपात हे व्हेरियंट्स आढळलेले नाहीत. एक्सई व्हेरियंटचा (XE Variant Sample) नमूना कुठून सापडला याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. पण याआधी महाराष्ट्र आणि गुजरातमधून मिळालेल्या एक्सई व्हेरियंटच्या संभाव्य नमुन्यांबद्दल विचारलं तर त्यातील महाराष्ट्रातील नमुना हा एक्सई व्हेरियंटचा नसल्याचं सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हे ही वाचा-आता लस घेतलेल्यांसाठीही डोकेदुखी ठरतोय कोरोना? नवीन संशोधनातून चिंता वाढवणारी माहिती समोर
इन्साकॉग या गटाच्या आठवड्याच्या बुलेटिनमध्ये एक्सई व्हेरियंट भारतात सापडल्याचं म्हटलं आहे. 25 एप्रिलला जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारी आता कोविडच्या केसेस वाढत असून 12 राज्यांमध्ये पुन्हा मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. दरम्यान 19 राज्यांतील कोविडच्या केसेस कमी झाल्या असल्याचंही या आकडेवारीत नमूद करण्यात आलं आहे.
आतापर्यंत ओमिक्रॉन BA.2 हा व्हेरियंट भारतातील सर्वाधिक प्रसार झालेला व्हेरियंट आहे. एक्सई व्हेरियंट हा रिकॉम्बिनंट म्हणजे नवनवी रूपं धारण करणारा आहे. म्हणजेच या व्हेरियंटमध्ये ओमिक्रॉनची BA.1 आणि BA.2 ही म्युटेशन्स आहेत आणि हा व्हेरियंट जानेवारी महिन्यात पहिल्यांदा यूकेमध्ये सापडला होता. एखाद्या विषाणूत जेनेटिक म्युटेशन (Genetic Mutation) होणं ही सामान्य प्रक्रिया आहे. अगदी किंचित म्युटेशन जरी विषाणूत झालं तरीही त्या विषाणूची प्रादूर्भाव करण्याची क्षमता प्रचंड प्रमाणात बदलू शकते आणि त्यामुळे माणसाला गंभीररित्या आजारी करण्याची क्षमताही वाढते, असं इन्साकॉगच्या बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.
BA विषाणूचे सब व्हेरियंट BA2.10 आणि BA2.12 हे व्हेरियंटदेखील सापडल्याचं या बुलेटिमध्ये म्हटलं आहे. हे दोन्ही व्हेरियंट दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत सापडल्याचं यात म्हटलं आहे.
या व्हेरियंटच्या प्रादूर्भावाबद्दल सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे नवे व्हेरियंट शोधून त्यांचा अभ्यास करणं हा तज्ज्ञांच्या कामाचा भागच आहे. पण जोपर्यंत विशिष्ट सामाजिक गटात या व्हेरियंटचा प्रादूर्भाव दिसत नाही, जोपर्यंत त्याची लागण झाल्याने गंभीर आजारी पडलेले पेशंट सापडत नाहीत किंवा गतीने याचा प्रादूर्भाव झाल्याचे पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिने या नव्या व्हेरियंटची भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही. कोविडचे नवे पेशंट दिल्ली सापडले आहेत याकडे सरकारी अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं असता ते म्हणाले की, डेल्टा किंवा ओमिक्रॉन विषाणूंची लाट आली होती तेवढ्या मोठ्या प्रमाणात दिल्लीतील प्रादूर्भाव सध्यातरी दिसत नाही. ही इन्फेक्शन्स आता श्वासाशी संबंधित इतर इन्फेक्शन्ससारखी दिसत आहेत. जेव्हा ऋतु बदलेल तेव्हा ही इन्फेक्शन्स वाढतील.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Covid-19, Omicron