नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : भारतात काही महिन्यांपूर्वी धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना महामारीच्या रुग्णांमध्ये ऑक्टोबर महिन्यात घट दिसून आली. त्याचबरोबर दररोज रुग्णांच्या संख्येत होणारी वाढदेखील कमी झाली आहे. त्याचबरोबर भारतात मृत्युदरदेखील कमी झाला आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते भारतात कोरोना आणखी वेगाने वाढू शकतो आणि आणखी काही पीक भारतात येऊ शकतात. मृत्युदर कमी होणं चांगली गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे, पण भारतात अजूनही कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात केसेस आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे भारतात अजूनही कोरोनाचे संकट वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. भारतातील तीन नावाजलेले डॉक्टर डॉ. रणदीप गुलेरिया, डॉ. गगनदीप कांग, डॉ. चंद्रकांत जहरिया यांनी आपल्या 'टिल वी विन: इंडियाज फाइट अगेंस्ट कोविड-19 पॅनडॅमिक’ या पुस्तकात हा दावा केला आहे.
या पुस्तकात त्यांनी केलेल्या दाव्यानुसार एखाद्या कोरोना झालेल्या रुग्णाला पुन्हा कोरोना होणं दुर्मिळ आहे. पण जर झालाच तर केवळ प्राथमिक लक्षणे दिसू शकतात. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची प्री सिम्पोटमॅटिक सर्व लक्षणं दिसून आली तर तो संसर्गजन्य ठरू शकतो असंही दिसून आलं आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार हे पुस्तक कोरोनासंबंधी तीन मुद्द्यांवर आधारित आहे. यामध्ये कोरोना बाकीच्या श्वसनाच्या आजारासारखा का नाही, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, तसंच फ्रंटलाईन वॉरियर्सच्या कथा आणि लस तयार करण्यामध्ये डॉक्टरांसाठी आणि भविष्यातील उपाययोजनांसाठी मार्ग निश्चित करणं या मुद्द्यांचा समावेश आहे. या पुस्तकात एकदा कोरोना झाल्यानंतर पुन्हा तो झाल्यास काय होतं याचं सविस्तर वर्णन करण्यात आलं आहे. याला लाँग कोविड म्हटलं जातं.
हे वाचा-कोराना काळात रेल्वेनं प्रवास करताय? धोका टाळण्यासाठी पाळा 'हे' नियम
त्याचबरोबर डॉ. गुलेरिया यांनी याविषयी सांगितलं, आपण उपचारांची सुरुवात केली तेव्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी करणं हा आमचा उद्देश होता. त्यानंतर आता आम्हाला यातून समजलं आहे की, कोरोनाच्या काळात व्यक्तीवर इतका परिणाम होत नाही जितका कोरोना झाल्यानंतर व्यक्तीच्या शरीरावर होतो. यामध्ये व्यक्तीच्या हृदयावर आणि फुफ्फुसांवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे यावर होणाऱ्या परिणामांची देखील चिंता करण्याची आपल्याला गरज असल्याचं त्यांनी यामध्ये म्हटले आहे.
हे वाचा-ब्राझीलमध्ये चिनी लशीविरोधात एल्गार; 300 नागरिक उतरले रस्त्यावर
त्याचबरोबर त्यांनी कोरोना लशीसंबंधी आपण संकटांचा सामना करत असल्याचं म्हटलं आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत भारतात लस येण्याची आशा आहे. पण त्यात अनेक बदलही होऊ शकतात. आपल्याकडे कोरोना लसीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सुरुवातीची लस प्रभावी निघेल असं सांगता येणार नाही पण नंतर येणाऱ्या लशी अधिक प्रभावी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढणाऱ्या असतील. त्यामुळे एकच लस असेल किंवा वेगवेगळ्या समाज घटकांना वेगवेगळी लस दिली जाईल हे आपण कसं ठरवणार. त्याचबरोबर संपूर्ण देशातील रुग्णांना आपण कशी लस देणार आहोत याचादेखील या पुस्तकात विचार करण्यात आला आहे.