नालासोपारा, 21 मे : कोरोनाच्या महामारीने अक्षरशः तांडव सुरु केला असून वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे 15 दिवसात 155 रुग्णांनी आपले प्राण सोडले आहेत. 10 ते 15 रुग्ण रोज दगावत असून ठेक्यावर चालणारा आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शासनाला किती रुग्णाचा बळी गेल्या नंतर वसई विरारला शासनाचा अनुभवी आरोग्य अधिकारी मिळणार आहे असा सवाल कॉंग्रेसचे वसई विरार जिल्हा सरचिटणीस रामदास वाघमारे यांनी विचारला आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी पालिकेच्या स्थापने पासून रिक्त आहे. सध्या रजेवर असलेले पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी वसई विरार महानगरपालिकेला शासनाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी द्यावा, यासाठी प्रधान सचिवांना पत्र दिले होते. मात्र त्याकडे आरोग्य मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याने वसई विरारला कोणी वाली नाही का असा सवाल जनता विचारत आहे. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार असून वसई-विरार शहर महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता होती. मात्र त्यांची मुदत संपल्याने सध्या प्रशासकीय राजवट सुरु आहे. महापालिकेच्या आरोग्य विभाग हा ठेक्याचे कर्मचारी चालवत असून नियोजनाभावी आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली असून वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा वाळके या कोणाचेच फोन उचलत नसल्याने नागरिकांना सुविधा मिळत नाही. हेे ही वाचा- तिसऱ्या लाटेचा धोका: रिलायन्स हॉस्पिटलने उभी केली लहान मुलांसाठी विशेष सुविधा एका ठेका कर्मचाराच्या हातात आस्थापना विभाग दिल्याने पालिकेच्या आरोग्य यंत्रणेत गोंधळ सुरु झाला असून हे कर्मचारी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना जुमानत नसल्याने अधिकारी सुद्धा ठेका कर्मचाराच्या पुढे हतबल झाले आहेत. वसई विरार मध्ये सुरवातीला मृत्युदर 3 टक्के होता मात्र तो आता वाढला असून जानेवारी मध्ये ०9 रुगाणांचा मृत्यू ,फेब्रुवारी ०5 रुग्णांचा मृत्यू, मार्च 15 रुग्णांचा मृत्यू, एप्रिल 186, 1 मे ते 15 मे 155 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा कमी होण्याऐवजी वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरित भरून अनुभवी आरोग्य अधिकारी द्यावीत, अशी मागणी शिवसेना नेते पंकज देशमुख यांनी खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे केली आहे. दरम्यान पालघर जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी वसई विरार महानगरपालिकेला वैद्यकीय आरोग्य अधिकारी देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन मागणी केली असून लवकरच वैद्यकीय आरोग्य अधिकारी मिळेल असे भुसे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.